विवेकानंद आश्रमात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान विवेकानंद जयंती महोत्सव
बुलढाणा/हिवरा आश्रम (संजय निकाळजे) – विवेकानंदाचे विचार मानव कल्याण प्रगतीसाठी पर्याय आहेत. या विश्वासाने निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी आयुष्यभर या विचारांना कृती रूपाने सेवेसाठी अंगीकारले. एका झोपडीच्या रूपात सुरू केलेले सेवा प्रतिष्ठान आज भव्य स्वरूपात जनसेवेसाठी भक्कमपणे उभे आहे. त्यांनी सुरू केलेला स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव लोकोत्सव बनला आहे. आणि त्याच अनुषंगाने यावर्षी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव भरणार आहे. त्याची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आहे. या निमित्ताने लाखो भाविकांच्या श्रद्धेचा व ज्ञान प्रबोधनाचा तसेच अन्नदानाचा अलौकिक हा सोहळा असून, दोन लाख भाविकांना या निमित्ताने महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.
या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये प्रबोधनकारांची विचारवाणी, भाविकांना जीवनमूल्याचे धडे देते. त्यात व्याख्याने, कीर्तन, प्रवचनाच्या स्वरूपात कार्यक्रम संपन्न होतात. तीनही दिवस मोफत अन्नछत्र सुरू असते. भाविकांनी उत्सवासाठी वेळेचे, वाहनाचे नियोजन सुरू केले असून गावोगावीचे कार्यकर्ते व्यवस्थापनाशी संपर्क साधून असतात. मान्यवरांचा निवास, भोजन तसेच स्वयंसेवकासाठीची व्यवस्था या निमित्ताने करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी जागावाटप सुरू झाली असून, नियम, अटींचे पालन करणाऱ्यांनाच सहभागी करून घेतले जाणार आहे. पोलीस प्रशासन, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामपंचायत सहकार्य एकमेकांना मिळत असते. स्वयंशिस्त नियोजन व बंधुभाव हे या उत्सवाचे वैशिष्ट्य राहिले आहे. कार्यक्रमासाठीचा मंडप टाकण्याचे काम जवळपास पूर्णत्वास जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी दोन लाख भाविकांना महाप्रसाद असे या उत्सवाचे स्वरुप असते. गेल्या एक महिन्यापासून कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यांचा सहभाग व नोंदणी सुरू झाली आहे. विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून, समित्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. गतवर्षी आलेल्या त्रुटी लक्षात घेऊन कामाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व जनतेने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.