Breaking newsHead linesWorld update

हे मंदीर केवळ पूजास्थान नाही तर भारतीय चेतनेचं प्रतिक – पंतप्रधान मोदी

– जगभरातील रामभक्तांनी घेतले सावळ्या राघवाचे विलोभनीय दर्शन
– अभिजित मुहुर्तावर झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान, सरसंघचालकांसह देशभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती

अयोध्या (कु. प्रणाली जोशी) – आज आपल्याला श्री रामाचे मंदिर सापडले आहे. गुलामगिरीच्या बेड्या तोडून राष्ट्र उभारले आहे. आमच्या प्रयत्नांमध्ये काहीतरी कमतरता राहिली असेल, ज्यामुळे आम्ही इतकी वर्षे मंदिरात रामललाची स्थापना करू शकलो नाही. श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत अनेक दशके कायदेशीर लढाई सुरू आहे. मी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानतो, ज्याने भारताची इज्जत वाचवली. प्रभू रामाचे मंदिरही जल्लोषात बांधले गेले. शतकानुशतके अभूतपूर्व संयम, अगणित त्याग, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभू रामाचे आगमन झाले आहे, हे मंदीर केवळ पूजास्थानच नाही तर भारतीय चेतनेचं प्रतिक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलल्ला सोमवारी (दि.२२) अभिजित मुहुर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाच्या बालस्वरूपातील मूर्तीची मंत्रोपच्चाराच्या निनादात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रामुख्याने उपस्थित होते.

देश-विदेशातील रामभक्त आणि सर्वसामान्य नागरिक ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करीत होते, त्या क्षणाला दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी सुरुवात झाली. ८४ सेकंदांच्या मंगलमय विधीनंतर रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, आणि देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि ठीकठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. देशाने पुन्हा एकदा रामदिवाळी अनुभवली. देशभरात धार्मिक मिरवणुका आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक डॉ. भागवत यांनीही देशाला संबोधित केले. तर, याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आज प्रभूश्रीराम आले आहेत. शतकानुशतके अभूतपूर्व संयम, अगणित त्याग, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभू रामाचे आगमन झाले आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. आज मला सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण घसा अडला आहे, शरीर थरथरत आहे, मन अजूनही त्या क्षणात गढून गेलेले आहे. आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही. आमचा रामलला आता दिव्य मंदिरात राहणार आहे. माझा ठाम विश्वास आहे आणि अगाध विश्वास आहे की जे काही घडले आहे ते देशाच्या आणि जगाच्या कानाकोपर्‍यातील रामभक्तांना नक्कीच जाणवत असेल. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हे वातावरण, हा क्षण आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आहे. आज शतकानुशतकांच्या संयमाचा वारसा सापडला आहे. २२ जानेवारी ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नसून, नवीन कालगणनेचा उत्सव आहे, असेही याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचीही सांगता केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना लष्करी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गोल्डन कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला होता. हातात मंगलमय कलश घेऊन त्यांनी मंदिरात प्रवेश केला. आजच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती. केवळ अयोध्याच नाही तर, संपूर्ण देशात राममय वातावरण दिसत होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदमयी आणि ऐतिहासिक सोहळा जगभरातील लोकांनी ‘याची देही याची डोळा’ पाहिला. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यात सिने कलाकार, व्यावसायिक, राजकीय नेते आणि खेळाडूंचा समावेश होता. यात प्रामुख्याने महानायक अमिताभ बच्चन, रजनीकांत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेत्री कंगना राणावत, रविंद्र जाडेजा, अनिल कुंबळे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा सहभाग होता. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची साथ लाभली. पंतप्रधान मोदी आणि मोहनजी भागवत यांनी मंत्रोच्चारात पूजा केली. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन हेदेखील गर्भगृहात उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू रामललाचे पहिले भव्य अलौकिक चित्र समोर आले आहे. गर्भगृहातील पूजेदरम्यान शंखांचा नाद आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. शहनाई आणि इतर शास्त्रीय वाद्यांसह प्रभू श्री राम यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!