BuldanaBULDHANAChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbha
चिखली तालुक्यातील लोकप्रिय नेतृत्वांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर वर्णी
चिखली (कैलास आंधळे) – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून, चिखली तालुक्यातील लोकप्रिय नेतृत्व तसेच माजी पालकमंत्री व सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे खंदे समर्थक असलेले गजानन वायाळ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर डॉ. विकास मिसाळ यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, श्री वायाळ हे चिखली तालुका अध्यक्ष व डॉ. मिसाळ यांनी उपाध्यक्ष म्हणूनही पक्ष संघटनेत काम पाहिलेले आहे. या दोघांच्या नियुक्तीने चिखली तालुक्यातील पक्ष कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. गजाननभाऊ वायाळ यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात असून, त्यांनी विविध विकासाचे प्रश्न सातत्याने मार्गी लावलेले आहेत. तर डॉ. विकास मिसाळ यांच्याकडे पंचक्रोशीतील जनता भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहात आहे.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजिदादा गट) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वायाळ हे चिखली तालुक्यात सर्वसामान्य व युवा कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व असल्याने, व त्यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपावली गेल्याने पुढील काळात राजकारणात जास्तीत जास्त तरूणांना संधी मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. वायाळ यांनी काहीकाळ चिखली तालुका अध्यक्षपदाची धुरादेखील सांभाळलेली आहे. त्यांच्याच कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागात पोहोचला होता. वायाळ हे मेरा बुद्रूक येथे वास्तव्यास असून, तेथील ग्रामपंचायतीमध्ये त्यांचीच सत्ता आहे. या परिसरात त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रूपयांची विकासकामे मार्गी लावलेली आहेत. त्यामुळे वायाळ यांना मानणारा मोठा वर्ग व व्यापक जनसंपर्क चिखली तालुक्यात आहे. तसेच, त्यांना मानणारा मोठा मित्र परिवार जिल्हाभरात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री आ. डॉ. शिंगणे यांच्या मान्यतेने सोपावली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मेरा बुद्रूकसह पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव आहे.
राजकीय प्रवासात अनेक चढउतार अनेक वर्षांपासून मी पाहत आलो आहे. पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना सिंदखेडराजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काजी यांनी दाखवलेला विश्वास यावर कोणत्याही प्रकारचा तडा न जाऊ देता, पक्ष वाढीसाठी काम करेल, व माझी नियुक्ती मी सार्थक ठरवेल.
– गजानन वायाळ, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बुलढाणा
दरम्यान, बुलढाणा जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी २० जानेवारीरोजी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील लोकप्रिय नेतृत्व तथा आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले डॉ. विकास मिसाळ यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मिसाळ यांनी मागील काळामध्ये खडकपूर्णा प्रकल्प कालवा, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत वितरण कंपनी इत्यादी विभागाशी संबंधित विषयास अनुसरून विविध आंदोलने केलेली आहेत. तसेच अतिवृष्टीधारकांना शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळवून देणे, शेतकर्यांना पीकविमा मिळवून देणे इत्यादी महत्वपूर्ण कामे त्यांनी शासन दरबारी संघर्ष करून मार्गी लावलेली आहेत. त्यांच्या या अविरत संघर्षाची पावती म्हणून त्यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांना देतात. डॉ. मिसाळ यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे, इसरूळचे सरपंच सतिश भुतेकर पाटील, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, पिंपळवाडीचे युवा नेते राहुल मिसाळ, चिखली तालुक्यातील शेतकरी चळवळीचे युवा नेते राजू पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे भूमिपुत्र तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मुख्य संपादक तथा उद्योजक पुरूषोत्तम सांगळे आदींनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
माझ्या या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांसह शेतकरी, युवक, सर्वसामान्य नागरिक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक जोमाने काम करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी आ.डॉ. शिंगणे साहेबांच्या नेतृत्वात काम करू.
– डॉ. विकास मिसाळ, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, बुलढाणा