DEULGAONRAJAHead linesVidharbha

अवकाळी पावसाने बळीराजाचे पांढरे सोने काळवंडले!

देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – देऊळगावराजा शहर हे कॉटन सिटी म्हणून मराठवाडा व विदर्भात प्रसिद्ध आहे. परंतु, पडलेला भाव आणि अल्प उत्पादनामुळे येथील अर्ध्याहून अधिक जिनिंग कमी प्रमाणात होणार्‍या आवकमुळे यावर्षी बंद अवस्थेत आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाचे पांढरे सोने काळवंडले असून, अल्पभाव मिळत असल्याने लागलेला खर्चसुद्धा मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे शेतकरीराजा पुरता मेटाकुटीला आलेला असून, सीसीआयच्या खरेदी केंद्राची प्रतीक्षा कायम आहे.

विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या देऊळगावराजा शहरात कापसाची आवक पाहता परराज्यातील व्यापार्‍यांनी येथे येऊन स्वतःचे जिनिंग फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातून प्रचंड प्रमाणात कापसाची आवक या ठिकाणी होत असते. खरीप हंगामामध्ये
सुरुवातीला अल्पवृष्टीमुळे कपाशीचे पीक वाचवताना शेतकर्‍यांना मोठा आटापिटा करावा लागला, आपल्याकडे असलेल्या उपलब्ध पाण्याचा विनियोग करण्यासाठी शेतकर्‍यांनी तुषार ठिबकसारख्या अत्याधुनिक सामग्रीचा वापर करून कसेबसे पीक वाचविले. कपाशी ऐन बोंडे लागण्याच्या अवस्थेत असताना त्यावर बोंडअळीसह विविध रोगांचे संक्रमण झाले, महागड्या औषधांची फवारणी करून कसेबसे कपाशीचे पीक वाचवले. त्यानंतर त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. एकरी कमाल मर्यादा असलेल्या उत्पादनावर निम्म्याहून अधिक घट झाली. उपलब्ध असलेल्या कापसाला दिवाळीनंतर बाजारात चांगला भाव येईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती विफल ठरली. गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी प्रतिक्विंटल १४ हजारापर्यंत गेलेला भाव यावर्षी सहा ते सात हजार प्रतिक्विंटल मिळत असल्याचे चित्र आहे.


खासगी जिनिंग धारकांकडून लूट!

कापूस खरेदीसाठी शासनस्तरावरून तालुक्यात दोन खाजगी जिनिंगला कापूस खरेदीची परवानगी देण्यात आलेली आहे. सदर जिनिंग हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कक्षेमध्ये येत नसल्याने कापसाचा भाव संबंधित जिनिगधारक व्यापारी ठरवतात, कापसाची ग्रेडिंग सुद्धा केल्या जात नाही. सदर खरेदी केंद्र एक देऊळगाव राजा शहरात तसेच एक देऊळगाव मही येथे आहे. शासनाकडून परवानगी देताना संबंधित जिनिंग धारकाला काही नियमावली देण्यात आलेली आहे. परंतु त्या संपूर्ण नियमावलीची पायमल्ली सदर ठिकाणी होत आहे.


अर्धा हंगाम झाला तरी सीसीआय केंद्र बंद!

– केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांना कापसाला हमीभाव मिळावा, यासाठी सीसीआय कापूस खरेदी केंद्राची तालुकास्तरावर परवानगी देण्यात येते. परंतु, कापसाचा अर्ध्याहून अधिक हंगाम झालेला असताना सीसीआयला चालू वर्षांमध्ये परवानगी नसल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. अद्यापपर्यंत हे केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आले नाही. सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीकडून पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हे केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मिळेल आणि शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळेल.

– समाधान शिंगणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, देऊळगावराजा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!