चिखली (कैलास आंधळे) – अमडापूर पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून, हे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, अन्यथा रिपाइंला पोलिस ठाण्यासमोर हे अवैध धंदे करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने युवा कार्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलीस स्टेशन अमडापूर ठाणेदार सचिन पाटील यांना दिले आहे.
या निवेदनात नमूद आहे, की अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वरली मटका, अवैध दारू, अवैध गौण खनिज वाहतूक, अवैद्य गुटखा, अवैध राशनचे तांदूळ-गहू, पत्त्यांचे क्लब चक्री इत्यादी सर्व अवैध धंदे हे निवेदन दिल्यापासून सात दिवसाच्याआत तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा हे अवैध धंदे बंद न झाल्यास रिपाइंच्यावतीने पोलीस स्टेशन अमडापूरच्या समोर अवैध दारू चक्री मटका, वरली, जुगार, गुटखा इत्यादी अवैध धंदे सुरू करण्याची परवानगी द्या. अन्यथा सर्व धंदे तात्काळ बंद करा, असे न झाल्यास दिलेले निवेदनच परवानगी समजून पोलीस स्टेशनसमोर अवैध धंदे चालू करण्यात येईल, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी उपस्थित आम्रपाल वाघमारे युवक जिल्हा कार्याध्यक्ष, दीपक जाधव रिपाइं कार्यकर्ते, सागर जाधव रिपाइं कार्यकर्ते, मयूर मोरे युवक तालुका उपाध्यक्ष, राजेश बोर्डे चिखली शहर अध्यक्ष, आकाश जाधव युवक तालुका सहसचिव, नितीन कांबळे चिखली शहर कार्याध्यक्ष, राहुल साळवे, पुंजाजी साळवे, रतन वानखेडे, सुदर्शन निकाळजे, पंकज वानखेडे, सैय्यद आयाज, ग्रा.पं.सदस्य, सागर वानखेडे, अनु भाई, भूषण निकाळजे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.