LONARVidharbha

महावितरण कर्मचार्‍यांचे सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – आपल्या विविध महत्वपूर्ण मागण्यांबाबत कालबद्ध आंदोलने करूनसुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने दखल न घेतल्याने अखेर कर्मचारी व अधिकारीवर्गाने मुंबई येथील आझाद मैदानावर धडक देत, धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सोमवारी (दि.११) कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या कृती समितीच्या नेतृत्वात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरातून सुमारे १४ ते १५ हजार कर्मचारी, अधिकारी येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वारस व कंपनी असलेली महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या लाईनस्टाफ कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लाईनस्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात येऊन नऊ संघटनांच्या कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता सेना, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी फोरम, म.रा.स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना, म.रा.स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोशिएशन, म.रा.नवनिर्माण वीज कामगार सेना, तांत्रिक कामगार युनियन, क्रांतीकारी लाईनस्टाफ सेना, यासह लाईनस्टाफ अभ्यास गटाचे पदाधिकारी यांच्या कृती समितीच्यावतीने कंपनी प्रशासनास लाईनस्टाफ कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आंदोलन नोटीस दिली. या नोटीसवर संचालकांच्या पातळीवर दोन वेळा आणि अध्यक्ष तथा एम.डी.यांच्यासमवेत एक बैठक संपन्न झाली. अत्यंत सकारात्मक चर्चा करण्यात आली व कृती समितीस तब्बल दोन महिने झुलवत ठेऊन मान्य केलेले मुद्देदेखील परिपत्रक काढून मार्गी लावले नाहीत. यामुळे कामगारांमधील प्रचंड नाराजी व या नोटीसमधील जिव्हाळ्याचे प्रश्नांसाठी नोटीसमधील क्रमबध्द आंदोलनानुसार दि.११ डिसेंबररोजी आजाद मैदान येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कामागारांचे प्रश्न महावितरण कंपनीतील वर्ग-४ च्या लाईनस्टाफ कामगारांची एन्ट्री पोस्ट कायम ठेऊन शैक्षणिक अर्हता प्राप्त लाईनस्टाफ कामगारांना वर्ग-३ मध्ये वर्ग करण्यात यावे, या करिता म. रा. विद्युत मंडळ असतांना अस्तित्वात असलेले पदे कारागीर अ, ब, व क, मिटर टेस्टर ग्रेड १/२/३ केबल जॉइंटर, तारमार्ग निरीक्षक, तारमार्ग बांधकाम कार्यदेशक, व इतर पदे पुन्हा बहाल करण्यात यावीत, महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावे, ग्रामीण भागातील लाईनस्टाफ कामगारांना रात्रपाळी भत्ता देण्यात यावा, अकोला झोन मधून-अकोला -वाशिम बुलढाणा- लाईन्स स्टॉप कर्मचारी आझाद मयदान मुंबईला दि. ११ डिसेंबररोजी जाणार व आक्रोश मोर्चाला हजर होणार व १२ डिसेंबर २०२३ ला संभाजीनगर येथील उपोषणाला पाठिंबा देणार आहेत.
आपल्या मागण्यांसाठी कृती समितीच्यावतीने क्रमबध्द आंदोलन नोटीस देण्यात येऊन पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात मंडळ आणि परिमंडळ कार्यालयासमोर व्दारसभांचे आयोजन, यानंतर कंपनीचे सिम कार्ड परत करणे, यानंतर वीज बिल वसुली बंद करणे, स्वतःचे वाहन वापरणे बंद करणे आणि यानंतर दि.११ डिसेंबररोजी आजाद मैदान येथे प्रचंड धरणे आंदोलन याप्रमाणे आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आलेली आहे. वरील सर्व आंदोलने पूर्ण करण्यात आले असून, दि. ११ डिसेंबर रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर राज्यभरातून १३ हजार लाईनस्टाफ कामगारांनी ऑनलाईन रजा टाकलेली असून, लेखी रजा देणार्‍या कामगारांची संख्या ३००० पर्यंत आहे. यामुळे या धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून जवळपास १४ ते १५ हजार लाईनस्टाफ कामगारांची उपस्थिती राहील, अशी माहिती कृती समितीच्या घटक संघटनांचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, वीज कर्मचारी, अधि. अभियंता सेनाचे प्रविण पाटील, बहुजन विद्युत अभियंता फोरमचे धर्मभूषण बागूल, म.रा.स्वं.बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे एस.के.लोखंडे, म.रा.स्वाभिमानी वर्कर्स युनियनचे पी.बी.उके, इलेक्ट्रिीसिटी लाइनस्टाफ असोशिएशनचे राजूअलीमौला मुल्ला, म.रा.नवनिर्माण कामगार सेनेचे श्रीकृष्ण खराटे, तांत्रिक कामगार युनियनचे प्रभाकर लहाने, क्रांतीकारी लाईनस्टाफ सेनेच ललित शेवाळे, आणि लाईनस्टाफ अभ्यास गटाचे सुभाष बार्‍हे, आदिनाथ पवार, स्वप्नील सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे.


प्रमुख मागण्या

– महावितरण कम्पनीतील लाईनस्टाफ कामगार यांचे कामाचे स्वरूप निश्चित करण्यत यावे.
– महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्यात यावी.
– पेट्रोल भत्त्यामध्ये वाढ करून दरमहा किमान २० लिटर किंवा सामान्य आदेश क्र.८९ / ९० प्रमाणे लागू करण्यात यावा.
– वीजबिल वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असून त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, व लाईनस्टाफ कामगारांना ५००० रूपयांच्या आतिल थकबाकीदारांची यादी सोपविण्यात यावी.
– सुरक्षा साधने व मेन्टनन्सकरिता योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे.
– कंत्राटी कामगार न ठेवता सरळ सेवा भरती माध्यमातून नोकरभरत्ाी करण्यात यावी.


आंदोलनाला रवाना होण्यासाठी कर्मचारी सज्ज

मुंबई येथील आंदोलनाला जाण्यासाठी संजय खार्डे, योगेश आमले, गणेश राठोड, रितेश तायडे, गणेश राठोड, अनिल गोरे, रवी अवगळे, सत्तार पठाण, शिवाजी काकडे, प्रमोद धनदर, गजानन वाघ, विष्णू भोसले, कैलास शिंदे, शेख इसाक, अमोल नाटेकर, संतोष आहेर, भुजंग पवार, सुरज खरात, रवी शेजुळ, श्रावण खानंदे, सतीश चौधरी, सतीश मुंडे व इतर असंख्य कर्मचारी बुलढाणा जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!