Breaking newsHead linesMaharashtraNagpurVidharbhaWorld update

येणारा काळ निवडणुकीचा; विषारी प्रचाराला बळी न पडता मतदान करा!

– रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा
– २२ जानेवारीला रामलल्ला मंदिरात विराजमान होणार

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – येणारा काळ निवडणुकीचा आहे. निवडणुकीत शिवीगाळ होईल. वातावरण कलुषित करण्याचा, एकतेला सुरूंग लावण्याचे प्रयत्न होतील. सुजाण नागरिकांनी त्यापासून सावध राहाणे आवश्यक आहे. मतदान करणे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठी संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करतील. भडकाऊ भाषणे ऐकून वा विषारी प्रचाराला बळी पडून मतदान करायचे नाही. तर कोण चांगला आहे, कोणी चांगले काम केले आहे, सद्या आम्हाला कोणता चांगला पर्याय उपलब्ध आहे, याचा विचार करून मतदान करायचे आहे, असे आवाहन करत, दरवर्षी जगभरात भारताविषयी वाटणार्‍या अभिमानात वाढच होत आहे. आज भारतात कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.

नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा अर्थात विजयादशमी उत्सव उत्साहात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कार्यक्रमाला उपस्थित होते. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन या सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सरसंघचालक म्हणाले, भारताने केलेले जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन ही विशेष बाब असून, या परिषदेच्या माध्यमातून विविध देशातल्या लोकांना भारताच्या वैविध्याची ओळख झाली. या परिषदेच्या माध्यमातून भारताचे राजनैतिक कौशल्य आणि ख्याती जगासमोर अधोरेखीत झाली. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत भारताने दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर झेप घेतली असून, भारतात स्टार्टअप क्रांती झाली आहे. जगात आणि भारतात असे काही लोक आहेत ज्यांना भारताची प्रगती व्हावी अशी इच्छा नाही, त्यामुळे ते समाजात तेढ निर्माण करत असतात. केवळ विरोधासाठी विरोध हे त्यांचे तत्वज्ञान असून यामुळे देशाचे नुकसान होत आहे. अयोध्येत राममंदिराची उभारणी होत असून, येत्या २२ जानेवारीला रामलल्ला मंदिरात विराजमान होतील आणि या दिवशी देशभरातल्या सर्व मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. भारतीय संस्कृती सर्वसमावेश असून, सर्व जाती आणि पंथांना सामावून घेणारी आहे. आपले पूर्वज समान असून, सर्व समावेशक संस्कृतीचा स्वीकार हाच आपल्या एकतेचा आधार आहे. राष्ट्राची एकता आपलेपणाच्या भावनेतूनच निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या संविधानाच्या चौकटीमुळे देशाची प्रगती झाल्याचे डॉ. भागवत यांनी सांगून, आपसातील वादांमध्ये समाजाने अडकून पडता कामा नये, असे आवाहनही सरसंघचालक डॉ. भागवत यांनी केले. चांद्रयान मोहिमेसह अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाल्याचेही त्यांनी याप्रसंगी आवर्जुन सांगितले.

ज्येष्ठ संगीतकार व गायक पद्मश्री शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीसाठी शांतता हा जागतिक शांततेचा मूलमंत्र असल्याचे सांगून शंकर महादेवन म्हणाले की, भारतात याचे प्रत्यंतर नेहमीच येते. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमाला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पथसंचलनाने प्रारंभ झाला. त्याआधी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी डॉ. केशव हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत, आदरांजली वाहिली. शस्त्रपूजन, पथसंचलन, ध्वजारोहण, घोषवादन, कवायत, सामूहिक गीत आणि मग सरसंघचालकांचे मार्गदर्शन हे कार्यक्रम झाले.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!