चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील रोहडा येथे निसर्गरम्य अश्या ठिकाणी वसलेली रेणुका देवी ,तसेच परिसरातील भाविक भक्ताचे आराध्य दैवत असलेली रेणुका देवी तिला तपोवन देवी म्हणून संबोधतात. येथे अतिप्राचीन असलेले रेणुका देवी मंदिर परिसरात सर्व भाविक भक्ताचे आराध्य दैवत आहे. नवरात्र उत्सवामध्ये असंख्य भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. लहान थोर सर्व या देवीच्या दर्शनाला येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून तपोवन देवीकडे पाहल्या जाते. १६०० पूर्वी चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील रोहडा येथे चिखली येथील रेणुका माता मंदिराची स्थापना करणार्या स्वामी बचानंद यांचे शिष्य नारायण स्वामी यांनी तपोवन देवीची स्थापना केली. त्याकाळी परिसरातील दुर्गम असलेल्या तपोभूमिमुळे या देवीला तपोवन देवी नाव पडले.
सिंदखेड राजाचे लखुजीराजे अर्थात जिजाऊंचे पिताश्री लढाईसाठी निघण्यापूर्वी याच मंदिर परिसरात त्यांचा मुक्काम असे, अशी ऐतिहासिक पृष्ठभूमि असणारे तपोवन देवीचे मंदिर सुरडकर कुटुंबियांच्या ताब्यात होते. मुगल बादशहाने सुरडकरांना देशमुखी बहाल केली, तेव्हापासून सदर मंदिर वंशपरंपरेने त्यांच्या ताब्यात होते. १२ मार्च १९८४ रोजी परिसरातील भाविकांनी न्यायालयीन लढाई जिंकून मंदिराचा ताबा घेतला. या मंदिराच्या परिसरात अनेक जिवंत पाण्याचे झरे आहेत, बारव आहेत, मंदिराभोवती निसर्ग रम्य परिसर आहे. स्वामी बचानंद महाराज यांनी चिखली, शेलूद, गोद्री, मर्दडी, अमडापूर, शेंडला, जानेफळ, घाटपुरी, देऊळगाव काळे, लोणार, बुलढाणा येथे जाऊन त्यांनी देवीचे महात्म्य सांगितले. मंदिरात सतत नंदादीप तेवत ठेवल्या जाते. रेणू राज्याने कन्याकामेष्ठी यज्ञ करून शंकर-पार्वतीला प्रसन्न केले असता यज्ञाच्या अग्नीतून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तिचे नाव रेणुका असे ठवले. खरे पाहता तिचे पाळण्यातील नाव कमळी असून, स्वयंवराच्या वेळी सर्व राजांना अव्हेरून तपस्वी जमदग्नी ऋषींना तिने वरले आहे. रेणुकादेवी ही राजकन्या, ऋषीपत्नी आणि वीरमाता या विविध भूमिका, रूपासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या यल्लमा या नावाने तिची पूजा, अर्चना केली जाते. पतीच्या संतापाला न जुमानणारी वीरपत्नी रेणुका ही अग्निप्रमाणे तेजस्वी आहे. अश्विन शुद्ध नवरात्र मध्ये येथे फार मोठ्या प्रमणावर भाविक भक्त दर्शनासाठी येतात. अशा या जगदंबेचा तेजोमय दर्शन घेण्यासाठी तपोवन येथील निसर्गाच्या स्वर्गात फार गर्दी असते. संत विष्णुदास यांनी आपला भक्तिभाव पूर्ण काव्याने संपूर्ण महाराष्ट्रात श्री रेणुकादेवीची महती जागृत ठेवली आहे.