सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सध्या दुसरबीड, ताडशिवणी कोल्हापुरी बंधार्याजवळ अवैध रेती वाहतूक राजेरोसपणे सुरू आहे. दि.६ सप्टेंबरच्या मध्यरात्री अचानक पावसाला सुरुवात झाल्याने रेती वाहतूक करणार्या ट्रॅक्टरची ट्रॉलीच रस्त्यावर फसल्याने खडकपूर्णा नदीपात्रातून रेती उपसा होत असल्याचे उघड झाले. परंतु, ‘ती” ट्रॉली रात्रीच पसार झाली असून वाळू उपसा बंद असल्याचे सांगत महसूल विभागाने सपशेल हात वर केले आहे.
एकीकडे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी वारंवार अवैध वाळूच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची आदेश देत रेती माफीयांना आवर घालून बेकायदेशीर उत्खनना विरोधात कठोर पावले उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्याच महसूल विभागातील अधिकार्यांकडून अवैध रेती वाहतूक करणार्यांना अभय दिले जात आहे. दि.६ सप्टेंबरच्या मध्यरात्री अचानक पाऊस आल्याने खडकपूर्णा नदीपात्रातून रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टरची ट्रॉली रेती खाली केलेल्या स्थितीत फसल्याची बंधारा रस्त्यावरील शेतकर्यांकडून माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. यावरून तलाठी यांनी पंचनामासाठी गेले असता सदर ट्रॉली चिखलात फसल्याने ओढून आणने शक्य नाही. असे सांगितले तर दि. ११ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी पंचनाम्याचा अहवाल व फसलेली ट्रॉली तलाठ्यांनी जप्त केली असून सिंदखेडराजाकडे घेऊन येत असल्याची माहिती दूरध्वनीवरुन दिली.
मात्र दि.४ ऑक्टोबर रोजी दुसरबीड मंडळाचे तलाठी यांच्याशी अहवालाबाबत संपर्क साधला असता बंधारा रस्त्यावर फसलेली ट्रॉली रात्रीच पसार केल्याचे सांगण्यात आले. तर सदर ट्रॉलीला नंबर, नाव नसल्याने तपास करणे शक्य नाही. यामुळे अहवालच तयार केला नसल्याची माहिती देण्यात आली. यावरून तहसीलदार व तलाठी यांनी दि ११ सप्टेंबर रोजी कारवाई होत आहे असे दर्शविले व दि.४ ऑक्टोबर रोजी संभ्रमित माहिती देत कारवाई बाबत हात वर केले. विशेष म्हणजे, सदर ट्रॉली पसार झाल्याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार महसूल विभागाने देण्याचा पुढाकार घेतलेला नाही. प्रशासनातील अधिकारीच कारवाईचा फार्स आवळण्यासाठी कुचराई करत असल्याने रेती माफीया हैदोस घालत आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकार्यांनीच दुसरबीड महसूल मंडळात लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा आहे.