खामगावच्या सुटाळपुरा येथे श्री गजानन महाराज प्रगटले?
– संत गजानन महाराज यांच्यासारखा दिसणारा तो व्यक्ती कोण?
खामगाव (भागवत राऊत) – खामगावच्या सुटाळपूरा येथे श्री संत गजानन महाराज प्रगटले असे मेसेज फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल झाले. दीपक क्षीरसागर (रा. सुटाळपुरा,खामगाव) यांच्या घरी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान श्री गजानन महाराज यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती ऑटोने आला, घरातील तुळशीच्या बाजूला जाऊन बसला. आपल्याजवळ असलेल्या पिशवीमधून गजानन महाराजांची प्रतिमा असलेला एक फोटो काढून घरातील दीपक क्षीरसागर यांना दिला. त्यांच्याशी गप्पा केल्यानंतर त्यांनी तुम्ही कोण आहात, कसे आला हे विचारपूस केली, तर तुम्हाला माणसातील देव दिसत नाही, असे म्हणून श्री गजानन महाराजांच्या वेशभूषेत आलेला व्यक्ती तिथून निघून गेला. दरम्यान, संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेत वावरणारा हा व्यक्ती काेण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, हा कुणी तरी बहुरूपी असावा, असाही संशय व्यक्त केला जात होता.
यावेळी सुटाळपुरा येथील राहणार देशमुख यांनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. माझा फोटो काढू नको, असे म्हणून त्या महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्तीने त्यांना फोटो काढण्यास नकार दिला. तेथून त्या महाराजांच्या वेशभूषेत असलेला तो व्यक्ती निघून गेला. संध्याकाळी ७ वाजता पुन्हा सुटाळपुरा येथील श्री गजानन महाराज यांच्या मंदिराजवळ पायरीवर बसलेला दिसल्यानंतर किशोर सातव (रा.सुटाळपुरा, खामगाव) यांच्या घरी त्यांना नेण्यात आले. यावेळी परिसरातील जवळपास दीड हजार लोकांनी महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या त्या व्यक्तीचे दर्शन घेतले, आरतीही यावेळी तिथे करण्यात आली. त्यानंतर महाराजांना सुटाळपुरा येथील एका व्यक्तीने शेगाव येथील रेल्वे स्थानकावर आपल्या मोटरसायकलने सोडून दिले. तेथे गेल्यानंतर ज्या व्यक्तीने त्यांना सोडले त्यांना ते म्हणाले की, मला सोडल्यानंतर मागे बघू नका, इथून निघून जा, तेथून महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्ती कोठे गेला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे? पण खरंच खामगावच्या सुटाळपुरा येथे श्री गजानन महाराज प्रगटले का ? की तो व्यक्ती असाच बहुरूपी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.