Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढविणार!

– मराठा समाजाला आरक्षण देताना ते न्यायालयात टिकणारे द्या; राज्य सरकारला सुनावले!

पंढरपूर/सोलापूर (हेमंत चौधरी) – आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघासह राज्यातील ४८ जागा स्वराज्य पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली. मराठा समाजाला आरक्षण देताना ते न्यायालयात टिकणारे असावे, असेही त्यांनी यावेळी राज्य सरकारला सूचविले.

संभाजीराजे छत्रपती हे पंढरपूर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे सांगून, राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अजून काहीच ठरवलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीची समीकरणे बनतील ते पाहून ऐनवेळी आघाडीबाबत निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की माझी आरक्षणासंदर्भातील भूमिका मी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे. तो एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, आधले-मधले लोक गडबड करतात, त्यातून मराठा-ओबीसींमध्ये वाद वाढू पाहात आहे. मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे न्यायालयात टिकणारे असावे, अशी अपेक्षाही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये बहुजनांना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांची भूमिका ही सर्व बहुजन समाज एका छताखाली राहावा अशीच होती. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना एकत्रित केले होते. मराठा आणि ओबीसी हे भाऊ असून, काही मंडळी हे वातावरण बिघडवत आहे. ९६ कुळी मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण नको, या नारायण राणेंच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी करणे संभाजीराजे छत्रपती यांनी टाळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला माहित नसल्याचे ते म्हणाले. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत असे सांगत, जे आरक्षण देणार असाल ते टिकणारे असावे. मराठा समाजाला महिनाभरात आरक्षण मिळेल की नाही, हे सांगायला मी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री नाही, असा टोलाही त्यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उपरोधिकपणे लगावला.

————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!