अवैध मुरूम उत्खनन भोवले; अंढेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकाला एक लाखाचा दंड!
– शासनाची परवानगी न घेता मुरूम उत्खनन करून रस्त्यावर टाकला!
चिखली (कैलास आंधळे) – अंढेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने शासनाची परवानगी न घेता, ई-क्लास जमिनीवर अवैध मुरूम उत्खनन केले व हा मुरूम गावातील रस्त्यावर टाकल्याची तक्रार गावातील राहुल अशोक इंगळे यांनी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असता, सरपंच व ग्रामसेवकाने अवैध मुरूम उत्खनन केल्याचे सिद्ध झाल्याने देऊळगावराजा तहसीलदारांनी सरपंच व ग्रामसेवक अंढेरा ग्रामपंचायत यांना एक लाख १७ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसांच्याआत भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईने अंढेरा येथे एकच खळबळ उडालेली आहे.
अंढेरा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता, ई-क्लास जमिनीवरील २१ ब्रास मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन केले, व हा मुरूम गावातील रस्त्यांवर टाकला. याबाबत अंढेरा येथील राहुल इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले असता, तलाठ्यांनी मोका पाहणी केली व तहसीलदार देऊळगावराजा यांना अहवाल सादर केला. या अहवालानुसार, २१ ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अंढेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकालाही म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला उत्तर देताना उत्खनन केले नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, महसूल विभागाच्या पाहणी व अहवालात अवैध उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार देऊळगावराजा यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना एक लाख १७ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसांच्याआत भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीवर झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. तर, सरपंच व ग्रामसेवक यांनी हा दंड ग्रामपंचायतीच्या फंडातून न भरता आपल्या खिशातून भरावा, अशी मागणीही काही ग्रामस्थ करत आहेत. स्वतःच्या चुकीचा फटका ग्रामपंचायत पर्यायाने ग्रामस्थांना बसू नये, असेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
—————