घाटाखालील आठ महसूल मंडळांत २१पेक्षा जास्त दिवस पावसाचा ‘खो’!
– जिल्ह्यातील इतर भागातील पीक परिस्थितीही गंभीरच!
– जाचक अटींचे भूत शेतकर्यांच्या मानगुटीवर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात घाटाखालील आठ महसूल मंडळांत २४ जुलै ते १८ ऑगस्ट यादरम्यान २१ पेक्षा जास्त दिवस पाऊसच बरसला नसल्याने पीकविमाधारक शेतकर्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने सदर महसूल मंड़ळात सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील इतर भागातील पीक परिस्थितीही गंभीरच आहे. मात्र जाटक अटी व शासनाची उदासिनता यामुळे शेतकर्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने कालावधी उलटला. या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस पड़लाच नाही. घाटावरच्या तुलनेत घाटाखाली जास्त पाऊस बरसला, पण नुकसानही झाले. हजारो हेक्टरवरील पिके होत्याची नव्हती झाली. जुलै व ऑगस्ट महिन्यात तर जिल्ह्यात खूपच कमी पाऊस पड़ला. त्यातही घाटावर पाऊस कमीच आहे. यामध्ये २४ जुले ते १८ ऑगस्ट यादरम्यान जिल्ह्यातील घाटाखालील आठ मंड़ळात महावेधच्या आकड़ेवारीनुसार २१ दिवसाच्यावर पावसाचा खंड़ पड़ला. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, जळगाव, आसलगाव, संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, बावनबीर, पातुर्ड़ा तर शेगाव तालुक्यातील जवळा वक मनसगाव महसूल मंड़ळाचा समावेश आहे. पूर, पावसातील खंड़, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकर्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकर्यांना २५ टक्केपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या निर्णयातील सूचने प्रमाणे प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पीक नुकसान सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी, तर सदस्यांमध्ये विद्यापीठ अगर कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी, मंड़ळ कृषी अधिकारी एक, पीकविमा कंपनी प्रतिनिधी, कृषी सहाय्यक एक व दोन व संबंधित शेतकरी यांचा समावेश आहे. सदर समिती वरील मंडळात सर्वेक्षण करत असून, काही मंड़ळातील सर्वेक्षणदेखील झाले असल्याची माहिती आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकड़े सादर करण्याचे आदेश तत्कालीन प्रभारी जिल्ह्याधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले होते. असे असले तरी ऑगस्ट महिन्यात मेहकर, खामगाव, सिंदखेडराजा, चिखली, लोणारसह जिल्ह्यात इतर भागातही पावसाचा पंधरा ते वीस दिवसाच्यावर खंड़ पड़ला होता. त्यामुळे पिके करपली. गेल्या चार-पाच दिवसात पाऊस आला, पण करपलेल्या पिकांना याचा पाहिजे तसा फायदा होणार नाही व इतर पिकांनाही फटका बसला. तर बरेच भागात हुमनी अळीने सोयाबीन पीक गड़प केले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशासह इतरही बरेच भागात तर दाणे न भरताच उभे सोयाबीन पिवळे पड़ून वाळत आहे. २१ दिवस पावसाचा खंड़ पड़ल्यास शासन काही अटीसह मदत देते, असे असले तरी जिल्ह्यात सर्वच भागात व जमिनीची पोत सारखी नाही. सिंदखेड़राजा, देऊळगावराजा, खामगाव तसेच मेहकर तालुक्यातील विशेषतः वरवंड़ महसूल मंड़ळातील काही भागातील जमीन हलकी असून, पाण्याचा लवकर निचरा होणारी आहे. या भागात चार, पाच दिवस पाऊस नसला तरी पिके माना टाकतात. त्यामुळे जाचक अटी शिथील करून अशा भागातही मदत देणे गरजेचे आहे. एकंदरीत शासनाच्या उदासीनतेमुळे व जुन्याच जाचक अटीमुळे नुकसान होऊनही बळीराजाला मदतीपासून वंचित रहावे लागत असल्याची ओरड़ होत आहे. शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचा आव आणणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तरी शासनाकडून नियमात शिथीलता देऊन शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.