– शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख किशोर गारोळे यांच्या संकल्पनेचे कौतुक!
मेहकर (अनिल मंजुळकर) – कृषीप्रधान आपल्या देशात पोळा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीत मशागत करणार्या बैलांना सजवून पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु मागील काही काळापासून शेतकरी आधुनिक शेती करत आहेत. त्यामुळे बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून, पोळा या सणाच्या दिवशी मेहकर शहरात अनोखा ट्रॅक्टर पोळा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या संकल्पनेतून भरवला गेला होता. या उपक्रमाचे चांगले कौतुक झाले.
जानेफळ रोडवरील शिवसेना (ठाकरे) संपर्क कार्यालयापासून या पोळ्याची सुरुवात झाली. शहर तसेच ग्रामीण भागातून अनेक शेतकर्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले होते. यावेळी सर्वप्रथम शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख आशीष रहाटे यांच्याहस्ते ट्रॅक्टरचे पूजन करून या पोळ्याला सुरुवात करण्यात आली. नंतर सजवलेल्या ट्रॅक्टरची मेहकर शहरातून भव्य अशी मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात काढण्यात आली. जानेफळ चौक येथून या ट्रॅक्टर मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ चौक, जुने बस स्टॅन्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका चौक, स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक या मार्गाने ग्रामदेवता शीतलामाता मंदिरावर दर्शन घेत, त्याच मार्गाने परत जानेफळ रोडवरील शिवसेना (ठाकरे) संपर्क कार्यालयासमोर या पोळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपआपले ट्रॅक्टर घेऊन या पोळ्यामध्ये सामिल झाले होते. या वेळी शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवसेना तालुका प्रमुख आकाश घोड़े, नेते श्याम पाटील निकम, संदीप गवई, अमोल बोरे, भरत चेके, असलम शाह, शेख खलील आदि सह पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.