– बुलढाणा, अमरावतीसह पश्चिम विदर्भातही पावसाने बळीराजाला दिलासा!
बुलढाणा/अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाची सुरूवात झाली आहे. पावसाने दमदार कमबॅक केल्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, मूंग, उडीद, ज्वारी आदी खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा देखील वाढत आहे.
सद्या पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी रविवारीदेखील पावसाचा जोर दिसून आला. या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्व विदर्भासह अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, शनिवारी जोरदार पाऊस बरसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने विदर्भात सर्वदूर हजेरी लावली असून, त्यामुळे पिकांना आधार मिळाला आहे.
राज्यातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रविवारी दिला आहे. या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.
ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरींमुळे दिवसभर वातावरण आल्हाददायक झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात काही ठिकाणी हलका, मध्यम पाऊस झाला. दिवसभर पावसाने जोर धरला नसला तरी त्यामुळे जनजीवन मात्र प्रभावित झाल्याचे दिसून आले. सोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी शेतकर्यांना अधिक पावसाची आवश्यकता आहे.
—-