प्रा. हरी नरके यांची क्रांतिदिनीच झालेली एक्झिट कधीही न भरून येणारी हानी!
– क्रांतिदिनी आपण क्रांतिकारक विचारवंतास मूकलो – सुनील सपकाळ
बुलढाणा (गणेश निकम) – फुले, शाहू, आंबेडकर यांचा जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार तळागाळात सामान्य माणसापर्यंत कसे रुजतील हे पहावे लागेल. प्रत्यक्ष कृतीत विचार उतरून काम करावे लागेल. हेच काम प्रा. हरी नरके यांनी हयातभर केले. क्रांतिकारकांच्या विचारांचे वाहक असणारे हरिभाऊंनी क्रांतीदिनी घेतलेली एक्झिट कधी न भरून येणारी हानी आहे, असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ यांनी केले.
शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने मान्यवरांचा सन्मान व दिवंगत विचारवंत हरी नरके यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन ‘शिवाज्ञा कार्यालयात’ करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले होते. तर राजर्षी शाहू परिवाराचे संदीपदादा शेळके, एडवोकेट जयसिंग राजे, मॉ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे, मराठा अर्बनचे जेऊघाले, राष्ट्रवादीचे नेते डी.एस. लहाने, प्रा. सदानंद माळी, एडवोकेट नंदूभाऊ साखरे, पत्रकार गणेश निकम आदींची उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बोरोटे, डॉ.शरद काळे, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष सागर काळवाघे, इंजिनिअर चौधरी, नगरसेवक युनुसभाई यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर शोण चिंचोले व सुनील सपकाळ यांनी सन्मानचिन्ह, बुक व बुके देऊन मान्यवरांचा सन्मान केला. पुढे बोलताना सुनील सपकाळ म्हणाले, हरिभाऊ नरके यांनी इतिहासाचे सखोल अध्ययन केले. पुराव्यानिशी इतिहासातील अनेक बाबी त्यांनी पुढे आणल्या. त्यांचे निधन मोठी हानी असल्याचे ते म्हणाले. तर एडवोकेट जयसिंगराजे देशमुख यांनी आजच्या चळवळी व त्या चळवळीसाठी पोषक भूमिका घेताना येणार्या अडचणी यावर भाष्य केले व हरिभाऊ नरके यांना आदरांजली अर्पण केली. संचलन गोपालसिंग राजपूत यांनी व आभार डी.एस. लहाने यांनी मानले.
वैचारिक उंची असणार्या विचावंतास मूकलो – संदीपदादा शेळके
हरिभाऊ नरके यांचा दोन वेळा सहवास लाभला. क्रांतिकारक विचार मांडणार्या व्यक्तींना आयुष्यात ताणतणावाचा सामना करावा लागतो. हरिभाऊंच जीवनदेखील धकाधकीच व संघर्षाचे असले तरी समाजासाठी उपकारक होते. हरी नरके सरांच्या निधनाने एक वैचारिक उंची असणार्या विचारवंतास आपण मूकलो असल्याचे संदीपदादा शेळके म्हणाले.