– तीन महिन्यांपासून चकरा, कर्मचार्यांचाही ताण वाढला!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयातील धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला असून, जिल्ह्यातील तब्बल १० हजार नागरिकांचे ड्रायव्हिंग लायसन्स वेटिंगवर आहेत. ट्रायल देऊन, आवश्यक कागदपत्रे देऊन आणि वरून एजंटांचे खिशेही भरून नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेले नाही. त्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. दरम्यान, या लायसन्सची प्रिटिंग बंद असल्याने हे लायसन्स प्राप्त होत नाहीत, अशी माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली आहे. तर, या परिस्थितीचा गैरफायदा ‘खाकी’वाले घेत असून, त्यांच्या तुंबड्या भरणे जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
‘नजर हटी, दुर्घटना घटी ‘ असे होवू नये यासाठी वाहन कोणतेही असो, प्रशिक्षीत चालक सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक आहे. आजकाल चारचाकी गाड्यांची तर संख्या मोठी वाढल्याने व वाढत असल्याने चालकांची मागणीदेखील वाढली आहे. सध्या अशी बिकट परिस्थिती आहे, की चारचाकी गाडी लगेच मिळते, पण प्रशिक्षीत चालकासाठी दहा ठिकाणी चौकशी करावी लागते. कारण त्या वाहनांची सगळी जबाबदारी सदर चालकावर असते. त्यामुळे अशा चालकांना मागणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना वाहन नियमात राहून चालविण्यासाठी लायसन्सची गरज असते. त्यासाठी इच्छुक लोक वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेऊन तर काही अनुभवी असलेले नागरिक आरटीओ कार्यालयाकडे आवश्यक डॉक्युमेंट, आवश्यक फी व ट्रायल देतात. काही दिवसातच सदर दुचाकी अथवा चारचाकीचे लायसन्स पोस्टाद्वारे घरी येते. जिल्ह्यातही जवळजवळ ६०च्यावर ड्रायव्हिंग स्कूल असल्याची माहिती आहे. पण गेल्या १० मेपासून म्हणजे तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील दुचाकी व चारचाकी चे नवीन तसेच नूतनीकरण असे नऊ ते दहा हजाराचे आसपास लायसन्स मिळाले नसून, ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकड़े पेंडिंग आहेत. प्रिंट लायसन्ससाठी संबंधितांकड़े विचारणा केली जात असून, प्रिंटीग बंद असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लायसन्स इच्छुकदेखील त्रस्त असून, यामुळे कर्मचार्यांचा ताणदेखील वाढला आहे.
लायसन्स प्रिंटीगबाबतचा युटीएल कंपनी सोबतचा करार संपला असून, शासनाने यासाठी आता एमसीटी कंपनीची नियुक्तीदेखील केली आहे. त्यामुळे लवकरच हा प्राब्लेम दूर होईल. शिवाय, ई-फॉरमॅटमध्ये ड़ी.जी.लॉकरमध्ये ड़ाऊनलोड़ केलेले लायसन्सदेखील ग्राह्य धरण्यात येते.
– प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा
विशेष म्हणजे, काहींना शासकीय नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठीदेखील लायसन्सची गरज पड़ते तर लायसन्सअभावी नोकरीसाठी मूकावे लागण्याची दुर्देवी त्यांच्यावर आली आहे. तसेच, जवळ लायसन्स नसल्याने खाकीवालेही चान्स मारून घेत आहेत. क्वचित प्रसंगी खिसे गरम करण्यावरून हमरीतुमरीदेखील त्यांच्याशी करावी लागत असल्याने नागरिक वैतागलेले आहेत. लायसन्सची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने चोवीस तासात प्रोसेस पूर्ण होते. पण प्रिंटीगअभावी वेटिंग वाढली आहे, असे एआरटीओ कार्यालयाचे संतोष घ्यार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकड़े लक्ष देवून ही गंभीर तितकीच रास्त समस्या निकाल काढावी, अशी मागणी बुलढाणेकर करत आहेत.