Breaking newsHead linesMaharashtraMumbaiWorld update

धो धो पावसात दरड कोसळली; अख्खे इर्शाळवाडी गाव गडप; 16 ठार, 100पेक्षा अधिक बेपत्ता

– अंधार व पावसामुळे बचावकार्य थांबविले, मदतीसाठी गेलेल्या जवानाचा हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू
– रायगड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, आंबा, सावित्री, पाताळगंगाने केले रौद्ररूप धारण

रायगड (दीपिका धर्माधिकारी/ संजय जोशी) – जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोरंबे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी या आदिवासी पाड्यावर दरड कोसळण्याची दुर्देवी घटना रात्री उशिरा घडली. या दरडेखाली अख्खा पाडा दबला गेला असून, हे वृत्तलिहिपर्यंत 16 मृतदेह हाती लागले होते. अजून 100  जण दबले गेले असण्याची भीती आहे. तर 98 जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. दबलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुले व महिलांचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेत 60 ग्रामस्थांना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आदिवासी पाड्याची लोकसंख्या अडिचशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. तब्बल ४८ घरे मलब्याखाली दबली गेली आहेत. बचावकार्यासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस पथकाचे जवान मेहनत घेत आहेत.  मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफने दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्याला दिशा दिली, तसेच पीडितांना धीर दिला. राज्यात चोहीकडे पावसाने धुमाकूळ घातला असून, चार जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील सहा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर आंबा, सावित्री आणि पाताळगंगा या तीन नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले आहे. 

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेबद्दल मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. ते म्हणाले, की काल रात्री या गावावर दरड कोसळली. दरडीखाली ३० ते ४० घरे दबल्याचा अंदाज असून, या आदिवासी पाड्यावर साधारणपणे अडिचशे लोकं राहतात. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून, १०० जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतल्या जात आहे. अग्निशमन दलाच्या एका जवानाचा या आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्याने मृत्यू झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती घेतली आहे. जिल्हाधिकारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मदत व बचावकार्य वेगाने सुरू आहे. गरज पडल्यास जखमींसाठी एअरलिफ्टची व्यवस्थादेखील केली जाणार आहे.


रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची माहिती देवेंद्र फडणीसांनी सभागृहात दिली. रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून आत्तापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या मदतकार्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे बराच वेळ चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 98 जणांना शोधण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मदतकार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इर्शाळवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सर्व माहिती क्रमवार सांगितली.


खालापूर चौक गावापासून हा आदिवासी पाडा सहा किलोमीटर अंतरावर असून, डोंगराच्या उतारावर असल्याने दरड कोसळताच अख्खा पाडा दरडीखाली गडप झाला. घटनेची माहिती मिळताच, मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यासह एनडीआरएफची टीम, पनवेल महापालिकेची रेस्क्यू टीम या दुर्गम भागात दाखल झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री गिरीश महाजन हेदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने यंत्रणा हलवून, मदत व बचाव कार्यात अडथळा येत असल्याने महामार्गापासून आतील मार्गात असलेले सर्व रस्ते बंद केले. तसेच, हेलिकॉप्टर बोलावून रेस्क्यू ऑपरेशनच्या सूचना केल्या. घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चौक येथे तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी मदतीसाठी ८१०८१९५५५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या नियंत्रण कक्षात पोहोचून अजितदादांनी स्वतः सर्व पाहणी केली व मदत व बचावकार्याच्या सूचना केल्यात. दरड दुर्घटनेत दगावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत केली जाणार आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सद्या पाऊस व धुके असल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. जखमींना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले होते.


रायगड इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 जण जखमी आहेत. या गावातील लोकसंख्या 228 आहे. 48 कुटुंबांचा ही वाडी होती. 98 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं आहे. त्यातील 60 ते 70 लोक गावाच्या बाहेर होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळाजवळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. 



गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने राज्यातील अनेक भागात नद्या, नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावातही पाणी शिरले आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचे स्थलांतर केले गेले आहे. पावसाने दाणादाण उडवल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काल तर पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. लोकलसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे घरी जाताना चांगलेच हाल झाले होते. आजही सकाळपासून अनेक भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!