सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून समाधान वाटत आहे. विविध ठिकाणी शेतकरी स्वागत, सत्कार करत आहे. या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढत आहे. शेतकर्यांनी सत्कारासाठी, स्वागतासाठी माझ्यावर उधळलेल्या फुलातील एकही पाकळी आयुष्यात व्यर्थ जावू देणार नाही, शेतकरी हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरु राहील, अशी ग्वाही शेतकरी नेते तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार रविकांत तुपकर यांनी दिली.
आंदोलनाच्या माध्यमातून रविकांत तुपकरांनी शेतकर्यांना पीकविमा आणि अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम मिळवून दिली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर ही रक्कम मिळाल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या वतीने रविकांत तुपकर यांचा गावोगावी सत्कार केला जात आहे. १७ जून रोजी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील शेतकर्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने मन प्रफुल्लित झाले असून हे प्रेम आणि आशीर्वाद लढण्यास बळ देत राहतील, असे प्रतिपादन तुपकर यांनी केले.
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले या दोन गावांमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित होता. परंतु ऐनवेळी शेतकर्यांनी गावात स्वागत आणि सत्कारासाठी बोलाविले. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा, हनवतखेड, सावंगी टेकाळे, निमगाव वायाळ गावात ऐनवेळी उत्स्फूर्त सत्कार समारंभ पार पडला. सिंदखेडराजा येथे तरुणांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवड्यासमोर सत्कार केला. त्यानंतर देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले, सूरा येथे गावकर्यांनी सत्कार केला. यावेळी शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरंबा फाट्यावर धोत्रा नंदई येथील युवकांनी देखील सत्कार केला तर वाघाळा येथे गावातून मिरवणूक काढून, फटाक्यांची आतषबाजी करत गावात स्वागत करण्यात आले, त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभाला शेतकरी, युवक, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शेतकर्यांनी माझ्यावर उधळलेल्या फुलाची एक पाकळीही व्यर्थ जावू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली.