सोलापूर (संदीप येरवडे) – राज्यातील दुसर्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रस्तावावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्याची मुदत वाढ मिळावी यासाठी बाजार समितीच्या संचालकांनी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन संचालकाकडे मागील काही महिन्यापूर्वी पाठवला होता. तो प्रस्ताव ग्राह्य धरीत सहा महिन्याची मुदतवाढ विद्यमान संचालकांना दिली आहे. त्यामुळे भाजप पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख हे सभापती असल्यामुळे त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव तात्काळ राज्य सरकारने केल्यामुळे आता काँग्रेस मधील आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या संचालकांचा विश्वास आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर वाढला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप पक्षाची सत्ता आहे. त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीच्या सभापती पदी देखील भाजप पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख हे आहेत. त्यामुळे मुदत वाढीचा प्रस्ताव शासनाने तात्काळ घेतला आहे. त्यामुळे पुढील सहा महिने विद्यमान संचालकांना काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तत्पूर्वी बाजार समितीच्या मागील पाच वर्षांमध्ये या संचालकांनी शेतकर्यांसाठी काहीच केले नाही. आता या सहा महिन्यात मुदत वाढ दिली तर काय करणार आहेत असा देखील सूर सध्या शेतकर्यांमधून निघत आहे.
दरम्यान, विद्यमान संचालकाचा कार्यकाळ जुलै महिन्याच्या १५ तारखेला संपणार आहे. त्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्याच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर सही केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत अद्याप बाजार समितीकडे मात्र कोणत्याही प्रकारचे पत्र आले नाही. परंतु सहा महिन्याचे मुदतवाढ मात्र नक्की मिळाली असल्याचे समजत आहे.
पणन संचालकाकडे सहा महिन्याचे मुदत वाढ मिळावी यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्रीशीर सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे आम्हाला ग्वाही दिली आहे.
– विजयकुमार देशमुख, आ. सभापती सोलापूर बाजार समिती