आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने ९ ते ११ जून २०२३ या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच आळंदी या ठिकाणी पालखी सोहळा प्रस्थाना निमित्त युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुते साठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त व्याख्यान, प्रवचन, कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सायंकाळच्या सव्वा सहाचे सुमारास पहिल्या सत्रात पुणे येथील ह.भ.प.धर्मराज महाराज हांडे, परभणी येथील ह.भ.प ठाकुरबुवा दैठणेकर, आळंदी येथील ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची व्याख्याने / प्रवचने होणार आहेत. सायंकाळच्या दुसऱ्या सत्रात ७ ते ९ जालना येथील ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर) यांची कीर्तने होणार आहेत. रोज रात्री ९.१५ ते ११.३०च्या सत्रात सौ. योजना शिवानंद पाटील, मुंबई यांचा जीव विठ्ठल शिव विठ्ठल हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भजनांजली हा कार्यक्रम होणार आहे. तसेच, लक्ष्मण सूर्यभान याचा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचे दर्शन करणारी सुवर्ण पिंपळ ही आध्यात्मिक नाट्यकृतीचा कार्यक्रम सादर होईल.
तसेच सकाळच्या सत्रात ह.भ.प. रामचंद्र महाराज इंगोले, ह.भ.प.श्री.अर्जुन महाराज लाड गुरूजी व ह.भ.प.अच्युतमहाराज दस्तापूरकर यांची कीर्तने होणार आहेत. काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ व विश्वदर्शन देवता भजनी मंडळ, विश्वराजबाग, पुणे यांची रहाणार आहे. अशी माहिती युनेस्को अध्यासन प्रमुख व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.