Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

कापूस, सोयाबीन कवडीमोल भावात; कांदा फेकून देण्याची वेळ, बियाण्यांचे भाव मात्र आकाशाला टेकले!

– शेतकर्‍यांना कुणीच वाली नाही! राजकारणी, शेतकरी नेत्यांच्या डोळ्यावर गेंड्याची कातडी!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – ऐन पेरणीच्या तोंड़ावर मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, कापसाचे भाव मातीमोल झाल्याने शेतकरी कोंड़ीत सापड़ला आहे. तर भाव नसल्याने कांदा रस्त्यावर फेकण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे. राबराब राबणार्‍या शेतकर्‍यांच्या कष्टाचा पालापाचोळा होत असल्याने संताप अन् चिंताही व्यक्त केली जात आहे. एकीकडे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली असताना, दुसरीकडे बँकांनीही पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, शेतकर्‍यांना सर्वांनीच वार्‍यावर सोडल्याचे दुर्देवी चित्र आहे.

गेल्या खरीप हंगामात सोयाबीन साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल तर कापूस ७ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव होता. पण या भावात खर्चही वसूल होत नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे भाववाढीच्या भाबड्या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणीसाठी काढलेले पैसे व व्याज अंगावर झेलत शेतमाल विकला नाही. पण नेहमीप्रमाणे झाले उलटेच. बाजारात सध्या सोयाबीनचे भाव साडेचार हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तर कापसाची परिस्थितीही वेगळी नाही. सध्या बाजारात कापूस ६ हजार रूपये क्विंटलने विकला जात आहे. असे असताना सोयाबीन बियाण्याची २५ किलोची बॅग मात्र ३६०० रूपयांना विकली जात आहे. शेती मशागतीचा अवाढव्य व न झेपावणारा खर्च व भाव पाहता, शेती दिवसेंदिवस आतबट्ट्याची होत चालली आहे. खर्च वाढत जातो अन् भाव नसल्याने कर्जही वाढत जाते, त्यामुळे शेतकरी मग काहीच इलाज नसल्याने आत्महत्येचा मार्ग निवडतो. गेल्या दोन, चार वर्षातील आकड़ेवारी पाहिली असता विशेषतः पश्चिम विदर्भात शेतकर्‍यांचे मरण स्वस्त झाल्याचे दिसत आहे. याबाबत शासन पाहिजे तेवढे गंभीर दिसत नाही. बियाणे व खताचे वाढलेले बेसुमार भाव व शासनाचे नसलेले नियंत्रण यामुळे शेतकरी पूर्णतः नागवला जात आहे. येणारे सरकार आपण कसे शेतकर्‍यांचे तारणहार आहोत हे पटवून देण्यात थोड़ीही कसर ठेवत नाहीत. पण प्रत्यक्षात कोणीही रस्त्यावर येत नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व नेते रविकांत तुपकर काय ते शेतकर्‍यांसाठी लढताना दिसतात. परंतु, त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतमालाला भाववाढ मिळाली नाही, उलट त्यांच्या आंदोलनातून भाववाढ मिळेल, या आशेपोटी शेतमाल राखून ठेवणारा शेतकरी चांगला भाव असताना शेतमाल विकला नाही म्हणून आता पश्चाताप करताना दिसत आहे. कांद्याला तर आता कवडीचाही भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. उन्हाळी भुईमुगाचेदेखील भाव घसरले असून, उसाला भाव नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी उभा ऊस पेटवून देत असल्याचे दिसत आहे. ऐन पेरणीच्या तोंड़ावरच शेतमालाचे भाव पड़ल्याने पेरणीची चिंता सतावत असून, राब राब राबूनही हाती काहीच पड़त नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या खरिपात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही मिळाली नाही तर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीचाही अद्याप थांगपत्ता नाही. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतमालाला योग्य भाव द्यावा, व पेरणीसाठी बियाणे परवड़णार्‍या भावात किंवा अनुदानावर सरसकट उपलब्ध करून द्यावे, म्हणजे बळीराजाला तेवढाच आधार होईल, अशी शेतकरी अपेक्षा करत आहेत.


बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखडता!

राज्य सरकारने प्रत्येक बँकेला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. परंतु, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यात सहकारी व खासगी बँका पीककर्ज वाटपात टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने बँकांची बैठक घेऊन त्यांना तंबी देण्याची गरज आहे. बँकांनी पीककर्ज दिले नाही तर शेतकर्‍यांना सावकारांच्या दारात जावे लागेल, तेव्हा जिल्हाधिकारी यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!