बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन बिबी येथे रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल ४० जणांनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
दिनांक ४ जूनरोजी सकाळी ठीक १० वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर गावकर्यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व नंतर शिबिराला सुरुवात झाली. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, सर्व गावकरी मंडळी यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये रक्त संकलन जालना ब्लड बँक यांनी केले. त्यातील संपर्क अधिकारी बाळासाहेब कठोरे व त्यांचे सर्व सहकारी प्रकाश सांगळे, लक्ष्मण दराडे, वैजनाथ जाधव, डॉ.वाघ, पूजा सिस्टर यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील तरुणांनी शिबिर पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले व रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.