पंकजा मुंडे-एकनाथ खडसे बंदद्वार एक तास चर्चा; राज्यातील नेत्यांचे ‘इंडिकेटर’ लागले?
– मुंबईत भाजपअंतर्गत हालचाली सुरू, तातडीच्या बैठकीची माहिती!
बीड (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्यात आज परळीत बंदद्वार तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नसला तरी, या बैठकीनंतर पंकजांच्या भूमिकेत चांगलीच आक्रमकता दिसून आली. आज स्व. गोपीनाथ मुंडे यांचा गोपीनाथगडावर स्मृतिदिन साजरा झाला. यानिमित्त आ. खडसे यांनी मुलगी रोहिणीसह स्मृतिस्थळी येत स्व. मुंडे यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे-पालवे यांची भेट घेत, त्यांच्याशी गोपनीय चर्चा केली. यंदा प्रथमच स्व. मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोणताही मोठा नेता आमंत्रित नव्हता. तर हभप. रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना, पंकजा यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. मला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्हाला समोर बसवून घेईल. मी घाबरणारी नाही. माझा नेता राज्यात नाही तर दिल्लीत आहे. अमित शाहांना भेटून मन मोकळे करणार आहे, असे त्यांनी नीक्षून सांगितले. दरम्यान, पंकजांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुंबईत फडणवीस गटाची बैठक झाल्याची माहिती असून, या बैठकीचा तपशील हाती आलेला नाही.
परळी येथील गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला. समाधीपूजन आणि हभप. रामराव ढोक महाराज यांचे हरिकीर्तन झाले. राज्यभरातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी स्मृतिदिन सोहळ्यास हजेरी लावून स्व. मुंडे यांना अभिवादन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे, बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, परळीचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीस्थळी जात स्व. मुंडे यांना आदरांजली अर्पण केली. तत्पूर्वी खडसे व पंकजा मुंडे यांच्यात तब्बल एक तास बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेनंतर पंकजा चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की माझे नेते अमित शाह आहेत. लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणार आहे. जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार, असे पंकजांनी जाहीर केले. तसेच, गोपीनाथ मुंडे यांचे वादळी जीवन होते. मी वादळाची लेक आहे. इथे वादळ येणार होते. मात्र, त्याची दिशा बदलली आहे. असे आमचं आयुष्य आहे, असे सूचक विधानही पंकजांनी केले. पंकजा यांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे स्वत:चा पक्ष काढा अशी मागणी केली. आम्ही तन मन लावून पक्षासाठी काम करु. गरज पडल्यास स्वत:चे रक्त देऊ, असेदेखील हा कार्यकर्ता म्हणाला. यावेळी प्रचंड गर्दीनेदेखील त्याला अनुमोदन दिले.
दरम्यान काँग्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठ वक्तव्य केल आहे. काँग्रेसचा दरवाजा पंकजा मुंडे यांच्यासाठी खुला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहिणीवर अन्याय होत आहे, त्या भावनेतून पंकजा मुंडे बोलल्या आहेत, असेही थोरात म्हणालेत.
पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडल्यानंतर इकडे मुंबईतही घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सर्व आमदार-खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीचा आणि पंकजा मुंडे यांचा काही संबंध आहे का? याबाबत तशी काही माहिती मिळालेली नाही. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीचा तपशील मात्र हाती आला नाही.
—————–