– डौलखेड येथे वीज पडून बैल ठार
– जामठी गावात पुरात पाच गायी वाहून गेल्या
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलढाणा व चिखली तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना भरउन्हाळ्यात पूर आला आहे. धाडजवळील बाणगंगा नदीला पूर आला असून, डौलखेड येथे वीज पडून बैल ठार झाला. चिखली तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने उरल्या सुरल्या शेतीपिकांची मोठी दाणादाण उडाली आहे.
धाडसह परिसरासह चिखली व बुलढाणा तालुक्यात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह २८ व २९ एप्रिलरोजी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे औरंगाबाद व धामणगावकडे जाणारे रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांची अक्षरश: दाणादाण उडाली. वादळी वार्यामुळे या भागातील विद्युत तारा तुटल्यामुळे भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक वेळ मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला होता. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात काही तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. नांदुरा तालुक्यातील मौजे डोलखेड येथील अनिल विजयसिग जाधव यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी झाला आहे.
अजिंठ्याच्या डोंगरदऱ्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने जामठी गावातील ओढ्याला आला पूर आला. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे शेतातून गावाकडे जाणारी काही गुरे बघता-बघता या पुराच्या पाण्यात वाहून गेली. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.