बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर असलेल्या सिंदखेडराजा टोल नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शनिवार, २२ एप्रिल रोजी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. समृद्धी महामार्गावर वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी सकाळपासून आरटीओसह अधिकार्यांनी वाहनांची तपासणी केली.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या मार्गावर छोटे-मोठे अपघात सुरूच आहेत. या अपघाताला नियंत्रण आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिंदखेडाराजा येथील टोलनाक्यावर प्रवास करणार्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यात वाहनांचे टायर, वाहनाची परिस्थिती, वाहनांचा वेग, बेल्ट इत्यादी बाबी तपासून जर वाहन व्यवस्थित असेल तरच पुढे प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, गेल्या काही दिवसांमध्ये आतापर्यंत १७ जणांचे मृत्यू अपघातामुळे झाले आहेत. त्यामुळे आता वाहन तपासणी मोहीम राबविले जात आहे. यात अनेकदा टायर फुटणे व कधी वाहन चालकाला झोप लागल्यामुळे नियंत्रण सुटून अपघात झालेले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून ही मोहीम घेण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर आरटीओ कार्यालय बुलढाणा यांच्या विद्यमाने वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये वाहनांचे टायरची स्थिती, टायरवर इंडिकेटर, टायरमध्ये असणारी हवाही चेक केली जाते. टायरची स्थिती जर योग्य नसेल तर त्याला पुढे प्रवेश नाकारण्यात येतो. तसेच अपघात होऊ म्हणून तीन नियमांचे पालन करावे. लेनची शिस्त, बेल्ट वापरणे, व स्पीड लिमिट पाळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
– प्रसाद गाजरे, उपपरिवहन अधिकारी, बुलढाणा.
——————–