हरभर्याचा दाणा अन् दाणा खरेदी करा; ‘नाफेड’चे खरेदी केंद्र तातडीने सुरू करा!
– जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन – नोंदणी झालेल्या सर्व शेतकर्यांचा हरभरा खरेदी करा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – हरभरा खरेदीचे जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगत, नाफेड़ने १० एप्रिलपासून हरभरा खरेदी अचानक बंद केली. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने तातडीने वृत्त
https://breakingmaharashtra.in/nafed_harbara_close/
प्रकाशित करताच, त्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तातडीने दखल घेत, जिल्हाधिकारी यांची कालच भेट घेऊन हरभर्याचा दाणा अन दाणा खरेदी करा. नाफेडचे खरेदी केंद्र त्वरित सुरु करुन नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांचा हरभरा खरेदी करावा, अशी माणगी केली आहे.
जिल्हाधिकारी तुम्मोड यांची भेट घेऊन व निवेदन देत रविकांत तुपकर यांनी सांगितले, की नाफेडअंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. दरम्यान, टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण सांगत नाफेडने अचानक खरेदी केंद्र बंद केली आहेत. वास्तविक पाहाता, जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्र २२ – २३ मार्चच्या दरम्यान सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत वातावरणात बदल झालेला असून, पाच ते सहा दिवस जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, सोसाट्यांचा वारा आणि अवकाळी पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आपला हरभरा घेऊन जाऊ शकले नाही. काही खरेदी केंद्रांकडून मोठ्या प्रमाात हरभरा घेऊन या असे मॅसेज प्राप्त झाले होते, त्यामुळे शेतकरी आपला माल घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रांवर रांगा लावून आहेत. मात्र, नाफेडने अचानक खरेदी बंद केल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकर्यांच्या घरात हरभरा अजून पडून आहे. हजारो शेतकर्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे परंतु नाफेडने अचानक खरेदी बंद केल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे, ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील नाफेडचे खरेदी केंद्र सुरु करुन जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा हरभरा नाफेडने खरेदी करण्याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
————————