– गॅस सिलिंडरसह दोन लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील पोलीस कल्याण शाखेच्या भारत गॅस एजन्सीचे गोदाम फोडून तब्बल ३० गॅस सिलिंडर लंपास करणार्या तिघा चोरट्यांना डीबी पथकाने अवघ्या ६ तासात सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. चोरट्यांकडून ९९ हजार ६९९ रुपये किमतीच्या सिलिंडरसह अॅपे वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावे, त्यासाठी पोलीस कल्याण शाखेमार्फत चालवण्यात येणार्या भारत गॅस कंपनीकडून गॅस सिलिंडरचा दीपक एजन्सीकडे पुरवठा केला जातो. गॅस एजन्सी पोलीस मुख्यालय व पोलीस वसाहतीला लागूनच मोकळ्या जागेत थाटली आहे. त्या ठिकाणी कार्यालय व गोडाऊन आहे. सोमवारी रात्री पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कुटुंबीयांच्या सेवेत असलेले भारत गॅस एजन्सीचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी ४ एप्रिलच्या पहाटे दरम्यान फोडले होते. अॅपे वाहनात चोरट्यांनी ९९ हजार ६९० रुपयांचे ३० गॅस सिलिंडर चोरून नेले होते. चोरी गेलेल्या सिलिंडरची किंमत प्रत्येकी ३,३२३ रुपये नुसार आहे. ग्रेड पोलिस उपनिरीक्षक आत्माराम जाधव यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याबाबत अप २८२, २०२३ कलम ४६१,३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बुलढाणा शहर पोलिसांनी तपासचक्र फिरविले. आरोपी दामोधर तोताराम गायकवाड (वय ४५) व रा. भीमनगर, वार्ड क्र. २ बुलढाणा यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे तीन साथीदार सुनील संजय काळे उर्फ लेमन रा. भीमनगर, नामदेव आनंदा खिल्लारे रा. क्रांतीनगर, बुलडाणा, दीपक सुरेश गोलांडे रा. संभाजीनगर, बुलडाणा यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन व चोरी केलेला ९९ हजार ६९० रुपयांच्या ३० नग भारत गॅस सिलिंडर व गॅस सिलिंडर वाहतूक करणारे एक लाख २० हजार रुपये किमतीचे अॅपे क्रमांक एमएच-२८-ए ०१५४ वाहन असा एकूण दोन लाख १९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या सूचनेनुसार बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील पोलिस उपनिरीक्षक सखाराम सोनुने, माधव पेटकर, प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे, नापोका गजानन जाधव, गंगेश्वर पिंपळे, युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगळे, महिला पोना सुनीता खंडारे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका शेख कयुम व नापोका सुभाष मान्टे हे करीत आहेत.