बुलढाणा (खास प्रतिनिधी) – भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात १४ ते १८ मार्चदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. १६ मार्च रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची, तुरळक ठिकाणी वादळी वार्याची (३०-४० किमी प्रती तास) गारपीट होण्याची शक्यता देखील जिल्हा कृषी हवामान, कृषी विज्ञान केंद्राने वर्तवली आहे.
हवामानात पुन्हा बदल होत आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची चिन्हे आहे. दरम्यान, शेतकर्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वार्याची व गारपीटीची शक्यता लक्षात घेता, शेतकर्यांनी गहू व हरभरा पिकांची कापणी केलेली असल्यास शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने, ताडपत्रीने झाकून ठेवावा, फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी. परिपक्व झालेल्या टरबूज पिकांची तोडणी करून ती फळे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत. तसेच संभाव्य गारपिटीमुळे फळांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतातील अपरिपक्व फळे गवताने झाकून ठेवावीत.
शेतकर्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. जनावरांच्या चार्याची व्यवस्था गोठ्यातच करावी. विजांबाबत पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाकडून करण्यात आले आहे.