BULDHANAHead linesVidharbha

हिरव्या स्वप्नांवर पुन्हा निसर्गाची टाच!

– नांदुरा येथील २३ गावे बाधित, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मोठा फटका

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने पुन्हा शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावर टाच दिली. ६ मार्चला रात्री झालेल्या पावसाने नांदुरा तालुक्यातील २३ गावातील ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी असली तरी, रंगपंचमीची सुट्टी असल्याने, इतर ठिकाणचे पीक नुकसान अद्याप समोर आले नाही. आधीच खरीप हंगाम ‘पाण्यात’ गेलाय. रब्बी पिकांवर भिस्त होती. संकटातून सावरलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या उमेदीने पदरमोड करून ३,०६,३१५ हेक्टरवर पिकांची लागवड केली. यंदा २१,८३०० हेक्टरवर हरभरा हे पिक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने रात्रीचा कहर चालविला असून, जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या रब्बी पीक उत्पादनाच्या आशेवरदेखील पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान केलेले आहे.

निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांना जगावे की मरावे ? हे कळेनासे झाले आहे. अस्मानी व सुलतानी संकटाचे शुक्लकाष्ट शेतकर्‍यांच्या पाठीमागे दत्त म्हणून उभे आहे. गतवर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम हातून निसटल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांसाठी पैशांची जुळवाजुळ केली. दरम्यान, पेरणीच्या तोंडावरच खतांची टंचाई निर्माण झाली. बियाण्याची दरवाढ देखील झळ पोचविणारी होती. कसे तरी तग धरून शेतकर्‍यांनी यावर्षी २१,८३०० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ५४,८१५ हेक्टरवर गहू,१०,७३५ हेक्टरवर ज्वारीची लागवड केली. मात्र अतिवृष्टीचा ससेमिरा गेल्यावर्षी खरिपात होता तसाच आता रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या पाठीमागे आहे. यंदा ज्या शेतकर्‍यांनी सुरुवातीला पेरणी केली त्या शेतकर्‍यांची पिके सुरक्षित राहिली. मात्र उशिरा पेरणी केलेल्या शेतकर्‍यांची अवकाळी पावसाने तारांबळ उडविली आहे.

सध्या पिके सोंगणीसाठी आलेले असताना, ६ मार्च रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. परिणामी शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा यासह फळबागा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेतातच सोयाबीन, हरभरा पिकांच्या गंजी लावून ठेवल्या. या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता बळावली असतानाच, ६ मार्चच्या रात्री बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील २३ गावातील ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. या क्षेत्रामध्ये गहू, हरभरा, मका आधी पिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात घाटावरील बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांतील नुकसानीची आकडेवारी जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!