– जिजाऊंना छोट्या गावापुरते मर्यादित करू नये – शिवाजीराजे जाधव
– बुलढाणा जिल्ह्यास जिजाऊ मॉसाहेबांचे नाव देण्याची मागणी ऐरणीवर!
बुलढाणा (गणेश निकम) – सिंदखेडराजा शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राजे लखोजीराव जाधव यांनी हे नाव दिले आहे. या शहराला एखाद्या क्रूरकर्म राजाचे नाव नाही. जसे औरंगाबाद, उस्मानाबादचे झाले अशा पद्धतीने नामांतर करायचेच असेल तर ते पुण्याचे केले पाहिजे. पुण्याचे जिजाऊ नगर करा, अशी मागणी जुनी आहे. एका छोट्या गावापुरते जिजाऊंचे नाव देऊन जिजाऊंना मर्यादित करण्याचे काम कोणीही करू नये. या पूर्वी जिल्हास्तर नामांतर झाले तसे बुलढाणाऐवजी जिल्ह्याचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की सिंदखेडराजा शहराला जे नाव प्राप्त झाले ते नाव राजे लखोजीराव यांनीच दिले आहे. एखाद्या क्रूरकर्मा राजाचे नाव सिंदखेडराजाला नाही. औरंगाबादचे संभाजीनगर झाले अशी पार्श्वभूमी सिंदखेडला नाही. सिंदखेडच्या जनतेने कुठली मागणीही केलेली नाही. राजे लखोजीराव जाधव घराण्यातील लोकांनीसुद्धा अशी मागणी पुढे आलेली नाही. असे असताना सिंदखेडचे नाव बदलण्याची चर्चा होणे योग्य नाही. सिंदखेडराजा परिसरात किनगाव राजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा गावे आहेत, यामागे इतिहास आहे. यापूर्वी जी नावे बदलली ती जिल्ह्याची बदलली आहेत. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे नाव जिजाऊंच्या नावावरून करावे, अशीदेखील मागणी आहे. यासाठी लोकांनी आंदोलने, निवेदने दिली आहेत. जिजाऊंचे नाव एका छोट्या गावाला देऊन जिजाऊंना मर्यादित करण्याचे काम कोणीही करू नये. जिजाऊ ह्या अत्यंत मोठ्या व्यक्तिमत्व आहेत. एखाद्या छोट्या गावाला त्यांचे नाव दिल्यापेक्षा पुण्यासारख्या शहराला ज्या ठिकाणी जिजाऊंचे कार्य, कर्तृत्व, बहरले तिथे जर नाव दिले तर ते अधिक समर्पक होईल, व जिजाऊंच्या कार्याची ओळखही होईल, असे राजे शिवाजीराजे जाधव यांनी म्हटले आहे. जाधव परिवारातील सदस्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
बुलढाणा जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ठिकाण शिवरायांच्या आई जिजाऊंचं जन्मस्थळ आहे. या शहराचं नाव जिजाऊनगर करण्याचा प्रस्ताव आहे. पण सिंदखेडराजा हेच नाव कायम ठेऊन बुलडाणा जिल्ह्याचं नाव जिजाऊनगर करावं, अशी मागणी शिवाजीराव जाधव यांनी केली आहे. जाधव यांनी म्हटलं की, “सिंदखेडराजा या शहराचं नाव कायम ठेवण्यात यावं. या शहराचं नाव जिजाऊ नगर करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनानं रद्द करावा. तसेच आपल्याला जिजाऊनगर हे नाव द्यायचं असेल तर बुलडाणा जिल्ह्यालाच हे नाव देण्यात यावं”