BULDHANAChikhaliHead linesVidharbha

अवैध सावकार अनिल तिडकेची बुलढाणा जेलमध्ये रवानगी!

– तिडकेचे पाय आणखी खोलात, साक्षीदारांचे जबाब नोंदविले!
– अवैध सावकारीतून जमिनी बळकाविले गेलेले अनेक पीडित शेतकरीही आता पुढे येण्यास सुरूवात!
– तिडकेच्या घरांची झडती, महत्वाची कागदपत्रे जप्त!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेळगाव आटोळ येथील मूळचा रहिवासी व सद्या चिखली येथे राहणारा अवैध सावकार अनिल दौलत तिडके यांच्या जाचास व शेतजमीन हडपल्याच्या छळास कंटाळून सुधाकर श्रीराम मिसाळ (वय ५५) रा. शेळगाव आटोळ या गरीब शेतकर्‍याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली होती. आरोपी अनिल तिडके याची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर अंढेरा पोलिसांनी त्याला चिखली येथील न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने तिडकेला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत, त्याची रवानगी बुलढाणा कारागृहात केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा कुशलतेने आणि सखोल तपास करणारे अंढेराचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे यांनी या प्रकरणात तीन साक्षीदारांच्या महत्वपूर्ण साक्षी नोंदविल्या असून, तिडकेच्या शेळगाव आटोळ व चिखलीतील घरांची झडती घेत, महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच, तिडकेचे पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत. त्याने आणखीही काही शेतकर्‍यांच्या जमिनी हडप केल्याची बाब उघडकीस आली असून, हे संबंधित शेतकरीदेखील तिडकेच्या विरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

मृतक सुधाकर मिसाळ

मागील जवळपास दोन दशकांपासून शेळगाव आटोळसह परिसरात अवैध सावकारी करत, गोरगरीब शेतकर्‍यांकडून पठाणी व्याजवसुली करून, त्यांना छळून, आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अवैध सावकार अनिल दौलत तिडके, रा. शेळगाव आटोळ याच्याविरोधात अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास अंढेरा पोलिस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे हे करत आहेत. पोलिसांच्या मागणीवरून चिखली न्यायालयाने अवैध सावकार तिडकेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावत, त्याचा ताबा अंढेरा पोलिसांकडे दिला होता. या दोन दिवसांत तपास अधिकारी वासाडे यांनी महत्वपूर्ण माहिती या तिडकेकडून वदवून घेतली. त्यानुसार, तिडकेच्या शेळगाव आटोळ व चिखली येथील घरांची झाडाझडती घेतली असता, त्याच्या घरात अवैध सावकारीशी संबंधित महत्वपूर्ण कागदपत्रे मिळून आली आहेत. तसेच, शेळगाव आटोळ येथील तीन साक्षीदारांचे जबाबदेखील नोंदविण्यात आले आहेत. आरोपी अनिल तिडकेच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर, त्याला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु, आरोपीच्या वकिलांनी विरोध केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अवैध सावकार अनिल तिडकेला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत, त्याची रवानगी बुलढाणा येथील कारागृहात केली आहे.

दरम्यान, अवैध सावकार अनिल तिडके याने इतरही शेतकर्‍यांच्या जमिनी अवैध सावकारीतून बळकाविल्या असाव्यात, जवळपास ५० एकरच्या आसपास त्याने व्यवहार केले असावेत, अशी शक्यता वर्तविली जात असून, त्यापैकी काही पीडित शेतकरी आता पुढे आले आहेत. ते लवकरच अंढेरा पोलिसांत याबाबत तक्रारी दाखल करणार आहेत. तसेच, याबाबत तालुका उपनिबंधकांकडे अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल करण्याची शक्यतादेखील निर्माण झालेली आहे. या प्रकरणाचा अतिशय कुशलतेने अंढेरा पोलिस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे हे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!