मेरा बुद्रूक, ता. चिखली (सुनील मोरे) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागाअंतर्गत घेण्यात येणार्या १० आणि १२ वीच्या परीक्षेला मेरा बु. येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सुरवात झाली आहे. मात्र ऐन परीक्षेच्यादरम्यान वीजवितरण विभागाकडून सकाळच्या वेळेत लोडशेडींग केल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फार त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ सकाळचे लोडशेडींग बंद ठेवावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
मेरा बु. येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र संचालक तथा शाळेचे पर्यवेक्षक सोळंकी यांच्या उपस्थितीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे. या परीक्षेसाठी मेरा बुद्रूकसह महाराणा प्रताप विद्यालय बेराळा, औठेर्श्वर विद्यालय अंढेरा, राजेशाहू शत्रपती विद्यालय अंचरवाडी, अशा चार शाळेचे एकूण ३३५ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेला उर्दू हायस्कूल मेरा खुर्द आणि मेरा बु. हायस्कूल या शाळेचे १५३ असे एकूण ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात. यावर्षी परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग परीक्षेवर करडी नजर ठेवून राहणार आहेत. मात्र असे असतांना इकडे मेरा खुर्द वीज वितरण विभाग लोडशेडिंगच्या नावाखाली दररोज सकाळी ६ ते ८ या वेळात दोन तासचे लोडशेडिंग करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची चागलीच डोकेदुखी बनली होती. अगोदरच दोन वर्षांचा कोरोनाचा काळ आटोपल्यानंतर ही पहिलीच परीक्षा सुरू असतांनाच ऐन परीक्षेदरम्यान दररोज दोन तासाचे लोडशेडिंग केल्या जात असल्याने पेपर कसे सोडवावे हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अशावेळी वीजवितरण विभागाने परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सकाळचे लोडशेडींग बंद ठेवावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
या परीक्षा केंद्रावर केंद्राबाहेरील गोंधळ, रोखण्यासाठी दक्षता समिती स्थापन केली, समितीमध्ये गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राजू पाटील, सरपंच, पो पा, बद्रिप्रसाद पाटील, बंडू पडघान, माजी सैनिक लिबांजी डोगरदिवे यांचा समावेश करण्यात आला. तसेच शाळेचे प्राचार्य शेख, पर्यवेक्षक एस बी सोळंकी, पथकात असलेले मंडळ अधिकारी शेळके, तलाठी शेख, साबळे यांच्या मार्गदर्शनात पी डी खरात, एस पी मोहोड, एस आर म्हस्के, बी टी इंगळे, केदार सर, दिलीप सानप सर, कु ए जी नागरे, पूनकर मॅडम, सोळंकी मॅडम, जे एच सौदागर, ए जी राठोड, लिपिक जी डी बुधवत, पी के पडघान, राठोड, आर पी पवार, अनिल जाधव, केशव बंगाळे मामा तथा शिक्षकेत्तर कर्मचारी काम पाहत आहेत.