– मृतक सुधाकर मिसाळ यांच्या शेतजमिनीचे खरेदीखत तिडकेच्या बायकोच्या नावाने?; तिलाही पोलिस सहआरोपी करणार का?
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेळगाव आटोळ येथील शेतकरी सुधाकर श्रीराम मिसाळ (वय ५५) यांचा अवैध सावकारीतून छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी तथा अवैध सावकार अनिल दौलत तिडके, रा. शेळगाव आटोळ याला पोलिसांनी काल अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्याला आज व उद्या (दि.२८) पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या तिडकेने सुधाकर मिसाळ यांची अर्धा एकर शेतजमीन ही त्याच्या पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे पुढे येत असून, अंढेरा पोलिस तिडकेच्या पत्नीसही सहआरोपी करणार आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, तिडकेकडे अवैध सावकारी करण्याइतपत अमाप पैसा आला कोठून? असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आणखीही काही शेतकरी त्याच्या सापळ्यात अडकले असण्याची शक्यता असून, हे शेतकरीदेखील आता पुढे येण्यास सज्ज होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मागील जवळपास दाेन दशकांपासून शेळगाव आटोळसह परिसरात अवैध सावकारी करून गरीब शेतकर्याकडून पठाणी व्याजवसुली करून त्यांना छळून आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अवैध सावकार अनिल दौलत तिडके, रा. शेळगाव आटोळ याच्याविरोधात काल अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास अंढेरा पोलिस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे हे करत आहेत. त्यांनी आज आरोपीला चिखली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडे त्यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली. परंतु, आरोपीच्या वकिलांनी विरोध केल्याने न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आज व उद्यापर्यंत अशी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस तपासात, तिडके याच्याकडे असलेली कागदपत्रे जप्त करणे, या गुन्ह्यात साक्षीपुरावे गोळा करणे, सुधाकर मिसाळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठोस पुरावे मिळवणे आदी तपासकामांवर पोलिस भर देत आहेत. त्याअनुषंगाने दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे हे आपले कौशल्य पणाला लावून तपास करत आहेत.
दरम्यान, विश्वासनीय सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, अनिल तिडके याने इतरही शेतकर्यांच्या जमिनी अवैध सावकारीतून बळकाविल्या असाव्यात, जवळपास ५० एकरच्या आसपास त्याने व्यवहार केले असावेत, अशी शक्यता वर्तविली गेली आहे. या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. तसेच, सुधाकर मिसाळ या आत्महत्या केलेल्या शेतकर्याची अर्धा एकर शेतजमीन ही तिडके याने त्याच्या पत्नीच्या नावावर खरेदी केली गेल्याची माहितीही चर्चेत आली आहे. त्यामुळे या महिलेकडे या शेतजमीन खरेदीसाठी पैसा आला कोठून? अवैध सावकारीत या महिलेचादेखील समावेश आहे का? याचाही तपास करून पोलिस या आत्महत्या प्रकरणात तिलाही सहआरोपी करणार आहे की नाही? याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. तसेच, जे शेतकरी तिडकेच्या अवैध सावकारीला बळी पडलेले आहेत व त्यांच्याकडून पक्क्या रजिष्ट्री करून घेण्यात आल्या आहेत, ते शेतकरीदेखील या प्रकरणात पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत तालुका उपनिबंधकांकडे अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल करण्याची शक्यता संबंधित शेतकर्यांची झाली आहे. तसे झाले तर तिडके याचे पाय आणखी खोलात जाणार आहेत. दरम्यान, आज व उद्या तिडके याचा ताबा अंढेरा पोलिसांकडे असून, पोलिस या प्रकरणाचा सर्वअंगाने तपास करत आहेत.
शेळगाव आटोळ येथील सावकारपीडित शेतकरी सुधाकर मिसाळ (वय ५५) यांनी तिडकेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पीडित शेतकरीपत्नी सिंधुबाई सुधाकर मिसाळ (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असला तरी, या गुन्ह्यात अचूक तपास व साक्षीपुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान अंढेरा पोलिसांपुढे आहे.
———————