पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ संघटनेचे पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोरील आमरण उपोषण उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ संघटनेच्यावतीने पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालया समोर अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी २१ फेब्रुवारी, मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदांची पदभरती करण्यात आलेली नाही. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने व निवेदने देऊनही शासनाकडून दखल घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदरील पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी, तसेच उच्च शिक्षण विभाग व वित्त विभागातील वरिष्ठ अधिकारी मंत्री यांच्यासोबत संघटनेची बैठक आयोजित करावी, या दोन मुख्य मागण्या घेऊन पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या विषयी सविस्तर चर्चा केली. तसेच संघटनेच्या मागण्या संदर्भात वरिष्ठांना उपोषणकर्त्यां समोरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली व अधिवेशन कालावधीत बैठक आयोजित करण्याचा शब्द दिला.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने, प्रसाद कर्डिले, नवनाथ शिंदे, शांतीलाल अहिरे, नेताजी मस्के, दिलीप शिंदे, डॉ. सिद्दिकी एम एफ, विना कुलकर्णी, मनीषा जामदार, डॉ. संदीप लोखंडे, गणेश जोरवर, डॉ. ज्ञानेश्वर माने, डॉ. किशोर पठारे सह आदींनी उपोषणात सहभाग घेतला होता.
———–
विविध संघटनांचा पाठिंबा –
ग्रंथपाल महासंघ संघटनेच्या उपोषणास राज्यातील विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्यात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररी असोसिएशन नांदेड कौन्सिल, नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन, कॉलेज लायब्ररीअन असोसिएशन कोल्हापूर यांनी उपोषणास पाठिंबा देत उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री व उच्च शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची पदभरती तात्काळ करावी व पदभरती संदर्भात मंत्रालयामध्ये संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी केली.
————
गेली अनेक वर्ष आम्ही ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीसाठी लढत आहोत. उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्या शब्दांचा मान राखत आम्ही पुणे येथील सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत आहोत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शब्द दिला होता की एक महिन्यात या पदांची भरती सुरू करू. त्यांनी दिलेला शब्द पाळावा व आमची पद भरती तात्काळ सुरू करावी.
– डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.