सोलापूर (संदीप येरवडे) – पदावर असताना बर्याच अधिकार्यांना सोलापूरचे महत्व कळत नाही. पदावरून पायउतार झाल्यावर मात्र त्यांना सोलापूर सोडवत नसल्याची अनेक उदाहरणे आपण यापूर्वी पाहिली आहेत. आता अगदी तसाच दाखला माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या बाबतीत देता येणार आहे. पुण्याला बदली झाली तरी बाबर यांना सोलापूर सोडवेना झालेय, अशी चर्चा आता शिक्षण वर्तुळात रंगली आहे.
बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या तर दहावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालकांनी काय करावे, यावर शिक्षणाधिकारी बाबर यांनी भाषण ठोकलंय. जुळे सोलापुरातील एका शिक्षण संस्थेत बाबर यांनी कार्यक्रमाला नुकतीच हजेरी लावली. विशेष म्हणजे, पदावर असताना कार्यालयात गर्दी पडते म्हणून बाबर हे याच शाळेत काम करीत बसायचे; त्यामुळे बदलीनंतर त्यांना आता ही शाळा सोडवेना झाल्याची शिक्षकांत चर्चा रंगली आहे.
माध्यमिक शिक्षण विभागात यापूर्वी शिक्षणाधिकारी पाटील यांची कारकीर्द वादळी ठरली. ते सतत रजेवर जात असल्याने लोकांची ओरड सुरू झाली. ते निवृत्त झाल्यावर बाबर यांची नियुक्ती झाली. सुरूवातीला त्यांनी कार्यालयात चांगलाच जम बसविला. कोरोनानंतर माध्यमिक शिक्षण विभागात गोंधळ सुरू झाला. बाबर यांना उच्च न्यायालयाने मागील काळातील चुकांवरून दंड ठोठावला. त्यानंतर त्यांची कार्यालयाला दांडी सुरू झाल्याने गोंधळात भर पडली. प्राथमिक शिक्षण अधिकार्यावर ‘ट्रॅप’ झाल्यावर तर बाबर गायब झाले. ओरड सुरू झाल्यावर निवृत्तीला सहा महिने असताना त्यांनी बदली करून घेतल्याची चर्चा आहे. पण आता बदली झाल्यावर मात्र त्यांना सोलापूर सोडवत नसल्याचे दिसून येत आहे. एरव्ही कार्यालयात हजर नसणारे बाबर आता कार्यक्रमात दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
———————-