Breaking newsHead linesMaharashtra

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, दहा मिनिटे वाढून मिळाली!

पुणे (प्रतिनिधी) – इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा वेळ वाढून मिळणार आहे. यामुळे या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. तसेच यासंदर्भातील सुधारित वेळादेखील जाहीर करण्यात येणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहेत. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच सहा वर्षापासून देण्यात येत होती. मात्र, प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे, असे ओक यांनी म्हटले होते.

दरम्यान, यंदा पेपरच्या आधीची १० मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जाणार नाहीत, त्यामुळे बोर्डाने पेपरच्या नंतर हे १० मिनिटे वाढवून द्यावेत, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. या मागणीला बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पालकांची ही मागणी बोर्डाकडून मान्य करण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केल्या आहेत. त्यानुसार आता निर्धारीत वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.

अशी आहे सुधारित वेळ

सकाळचे सत्र सकाळी ११ ते दुपारी २:१०
सकाळी ११ ते दुपारी १:१० मिनिटे
सकाळी ११ ते दुपारी १:४० मिनिटे
दुपारचे सत्र – दुपारी ३ ते सायंकाळी ६:१० मिनिटे
दुपारी ३ ते सायंकाळी ५:१० मिनिटे
दुपारी ३ ते सायंकाळी ५:४० मिनिटे
—————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!