भाजपकडून लवकरच एकनाथ शिंदे गटाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण
– शिवसेनेचे ९ खासदारही फुटण्याची शक्यता
– शिवसेना फुटली? : मुख्यमंत्री ठाकरेंच्या बैठकीला फक्त १२ आमदार
– संघर्षासाठी तयार रहा, शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना कानमंत्र
मुंबई/ गुवाहाटी (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पाडण्याची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४२ आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून, सात अपक्ष आमदारही शिंदेंच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे आजरोजी शिंदेशाहीत तब्बल ४९ आमदार सहभागी झाले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळविण्यासाठी शिंदे यांना फक्त ३७ आमदारांची गरज होती. प्रत्यक्षात ४२ आमदार त्यांच्यासोबत असल्याने शिवसेनेचा दुसरा गट म्हणून त्यांना मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी सोबत या, असा अधिकृत निरोप शिंदे यांना देण्याचे ठरले आहे. त्यानुसार, लवकरच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणू शकतात, व सत्ता स्थापनेचा दावाही करू शकतात.
राज्यात सरकार स्थापन करणेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. शिंदे यांच्यासोबत यापूर्वी फडणवीस यांचे दूत म्हणून जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी चर्चा केलेली आहे. त्यानुसार, भाजपकडून राज्यातील सरकारमध्ये ८ कॅबिनेट मंत्रीपद, ५ राज्यमंत्रीपद आणि केंद्रातही २ मंत्रीपदे देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त १२ शिवसेना आमदार हजर राहिलेले आहेत. त्यामुळे उर्वरित आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ९ खासदार
दरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडले नाही तर नऊ खासदारदेखील फोडले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. शिंदे यांचे बंड यशस्वी झाले आणि शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली तर शिवसेनेच्या १९ पैकी ९ खासदारांनी शिंदेंच्यासोबत जाण्याचा इरादा पक्का केला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (ठाणे), राजन विचारे, भावना गवळी, कृपाल तुमाने हे शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात, असेही या सूत्राने सांगितले.
—
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त १२ आमदार!
शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल आमदार : अजय चौधरी, रविंद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, उदय सामंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फतरपेरकर आणि आदित्य ठाकरे
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अखेर उभी फुटली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसत, त्यांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त १२ निष्ठावान शिवसैनिक आमदार हजर राहिले आहेत. त्यावरून शिवसेना उभी फुटली असल्याचे दिसून आले. अतिशय अतितटीची बनलेली राजकीय परिस्थिती पाहाता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक घेत, संघर्षासाठी तयार रहा, असा कानमंत्र दिला आहे. महाराष्ट्रावर आलेले हे राजकीय संकट निवारण्याचे शेवटचे प्रयत्न आता पवार करणार आहेत.
काल रात्रीच वर्षा बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथेच आज पुन्हा शिवसेना आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला अजय चौधरी, रविंद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, उदय सामंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राहुल पाटील, रमेश कारगावकर, प्रकाश फटरपेरकर यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे असे एकूण १३ आमदार उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे की कसे, याची चाचपणी आता ठाकरे यांच्या राजकीय चाणक्यांकडून होत आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय सिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, त्यांच्यावर ठाकरे यांनी कसा अन्याय केला, याचा पाढा वाचला आहे. हे पत्रच एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्हायरल केले आहे.
या सर्व घडामोडी पाहाता, शरद पवार यांनीदेखील आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना, शरद पवार म्हणाले, की आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कठोर पाऊले उचलण्यास सांगितले आहे. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत राहणार आहे. आणि, आम्ही सत्ता गमावली तरी आम्ही तुमच्यासोबत पुढील राजकीय संघर्षातही सोबत राहू. पक्षाच्या नेते व आमदारांनीही आता संघर्षासाठी तयार रहावे, असे पवार यांनी सांगितले.
https://twitter.com/i/status/1539889406676414464