BULDHANAHead linesMaharashtraVidharbha

शेतकर्‍यांवरील लाठीचार्जप्रकरणी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाला तात्काळ निलंबित करा!

– बुलढाण्यातील शेतकरी लाठीचार्जची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करा!
– शेतकरीविरोधी शिंदे-भाजप सरकारला शेतकरीच धडा शिकवतील!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर बुलढाणा पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणार्‍या अन्नदात्यावर भाजप सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करावे, व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शेतकर्‍यांवर केलेल्या पोलीस अत्याचाराचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. पटोले पुढे म्हणाले की, शेतकरी संकटात आहे, शेतमाला योग्य भाव मिळत नाही, त्याउलट भाजपा सरकारच्या काळात खते, बि-बियाणे, डिझेल महाग झाल्याने शेती करणे परवडत नाही. यावर्षीही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. १६ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई मिळावी. कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते, पण पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे आंदोलक शेतकर्‍यांना भेटण्यास जात असताना त्यांनाही पोलीसांनी अडवले. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे लोकशाही राज्यात गुन्हा आहे का? लाठीचार्ज करण्याची काय गरज होती? शिंदे-फडणवीस सरकारची ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.


भारतीय जनता पक्ष हा शेतकरीविरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. काळे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी लाखो शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केले, पण ते आंदोलन अमानुष पद्धतीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला होता. या आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले. शेवटी बळीराजाच्या निर्धारापुढे अंहकारी मोदी सरकारलाही झुकावे लागले होते हे शिंदे-फडणवीस सरकारले लक्षात ठेवावे. केंद्रातील मोदी सरकारचे हस्तक राज्यात असंवैधनिक पद्धतीने सत्तेत आले व केंद्राचाच कित्ता गिरवत आहेत. बुलढाण्यात शेतकर्‍यांवर केलेल्या पोलीस अत्याचारातील दोषींना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!