कर्जत (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघ कर्जत तालुका अंतर्गत जिजाऊ बिग्रेड मार्फत एकल व विधवा महिलांचा तिळगुळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम नुकताच कर्जत मध्ये पार पडला. सामाजिक बांधिलकी जपताना जुन्या परंपरेला छेद देत या महिलांना तिळगुळ व हळदी कुंकवाचा मान देऊन तसेच कढीपत्ता रोप, पुस्तक व पीस याचे वाण देत पर्यावरण संवर्धनाचा तसेच वाचन संस्कृती वाढवण्याचा संदेश देवून चहा पान करून आगळा वेगळा सोहळा जिजाऊ ब्रिगेड कर्जत शाखेने साजरा केला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रूपचंद जगताप साहेब हे होते.
समाजातील काही अनिष्ट प्रथा मुळे समाजाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या या महिलांना मानाचे स्थान मिळावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे मत जिजाऊ ब्रिगेडच्या कर्जत तालुकाध्यक्ष उज्वला शेळके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ पवार मॅडम प्रा.पावणे मॅडम यांनी विस्तृत अशी स्त्री जन्माची कहाणी सांगितली तसेच स्त्रीच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला. पती गेल्यानंतर पत्नीचे सौभाग्य अलंकार काढून घेण्याची प्रथा काळानुरूप बंद झाली पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केले. अकाली पती गेलेचे दुःख हे सर्वात मोठे दुःख असते पण मुलांसाठी आईला उभे राहावे लागते समाजातील अशा महिलांच्या पाठीशी जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ कायम उभा राहील असे अनेकांनी म्हटले. यावेळी कापरेवाडीच्या हर्षदा खराडे, उज्जला शेळके, डॉक्टर शबनम इनामदार कवयत्री स्वाती पाटील, नेटके मॅडम, वैशाली तनपुरे, भारती मॅडम, वंदना मोहिते, रसाळ मॅडम तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष जगताप साहेब, व अमित देशमुख, मिसाळ भाऊसाहेब, काळदाते रावसाहेब, लगड यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात शिंदेवाडी येथील 102 वर्षाच्या विधवा आजी सखुबाई तोरडमल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब क्रांतीवीर सावित्रीबाई फुले व श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग धनवडे यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार मनोज घालमे यांनी मानले. राजेंद्र ननवरे यांनी मोफत वाण म्हणून भेट देण्यासाठी रोपे दिली बापूसाहेब शिंदे यांनी 50 कापडाचे पिस देवून सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. येथून पुढे ही असेच समाज विधायक कामे केली जातील असे मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक कालिदास शिंदे यांनी सांगितले.