– उद्धव ठाकरे, भाजप, राहुल गांधी यांच्यावर गट अध्यक्षांच्या मेळाव्यातून जोरदार टीका
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – ‘आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्षांचा मेळावा आज मुंबईतील नेस्को मैदानात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच लोकांशी थेट संपर्क साधणारा प्रत्येक गट अध्यक्ष माझ्यासाठी राज ठाकरे असल्याचेही स्पष्ट केले. माझ्यासाठी लोकांमध्ये मिसळणारा, त्यांच्याशी थेट संवाद साधणारा प्रत्येक गट अध्यक्ष राज ठाकरे आहे. सध्या वातावरणात निवडणूक दिसत नाही. पण येत्या काही महिन्यांत ती लागू शकते. महाराष्ट्राचा सर्वच बाजूंनी खोळंबा झाला आहे. त्यांना डोकी खाजवू द्या. आपण आपली तयारी करू, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मराठी आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. ‘एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली आणि सत्तांतर घडवलं. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहे. मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? भूमिका घ्यायच्या नाहीत. फक्त यांना सत्ता हवी आहे, अशा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवरून नाराजी व्यक्त केली. कोणीही उठतो आणि काहीही बोलतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जातीपातीचं विष कालवण्यासाठी साधू संतांनी आपल्यावर संस्कार केले का? असा महाराष्ट्र आम्ही पाहायचा का? परंतु, राज्यातील या वातावरणामुळे आज अनेक तरूण-तरूणी बाहेरच्या देशात शिक्षणासाठी जात आहेत, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.
बाळासाहेबांची (स्व. बाळासाहेब ठाकरे) इच्छा होती. मशिदीवरील भोंगे निघाले पाहिजेत. आपण काढायला नाही सांगितलं. फक्त हनुमान चालिसा लावू म्हणालोत आणि भोंगे उतरले. अजूनही काही ठिकाणी चर्बी उतरलेली नाही. जिथे जिथे भोंगे चालू असतील तिथे पोलिसांकडे तक्रार करा. पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. पोलिसांकडून काही झालं नाही तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा. त्याशिवाय, हे वठणीवर येणार नाही. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असंच होणार, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
पंतप्रधान मोदींवर निशाणा
दोन प्रकल्प गुजरातमध्ये गेले याचे वाईट वाटत नाही, पण ते केवळ गुजरातमध्ये जात आहे याचे वाईट वाटतंय, पण बाकीच्या कोणत्याही राज्यात प्रकल्प जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरात गुजरात करताय सर्व राज्यांना समान न्याय देत नाही, असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
अब्दुल सत्तार यांच्यावर टीका
हल्ली कुणीही येतं काहीही बरळतं. राजकीय पक्षांचे प्रवक्ते टीव्हीवर काहीही बोलत असतात. मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधीही पाहिला नाही. एक मंत्री महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला भिकारचोट म्हणतो, इथपर्यंत पातळी गेली आहे. त्यांची भाषा काय असते, त्यांना वाटतं की आपण विनोद करत असतो. काही प्रवक्ते बोन्साय झाडाप्रमाणे असतात. पण मोठ्या गोष्टी करतात. आता कॉलेजमध्ये असलेले तरूण मुलं-मुली हे सगळं पाहत असतील. हे म्हणजेच राजकारण असा त्यांचा समज होईल. संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले आहेत का? तरुण विद्यार्थी देशाबाहेर जाण्याविषयी बोलत आहेत, हे योग्य नाही, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगून, अब्दुल सत्तार यांच्यावर नामोल्लेख टाळून टीकास्त्र डागले.
—————–