– अकोला तालुक्यातील निंबा येथील दुर्देवी घटना
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली असून, विजांच्या कडकडाट धो धो कोसळत असलेल्या पावसाने अकोला तालुक्यातील निंबा येथे सायंकाळी पाच वाजता शेतकर्याचा बळी घेतला आहे. तर सोबतचे एक शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. या पावसाने सोयाबीन पिकाची अतोनात नासाडी झाली आहे.
अकोला तालुक्यासह जिल्हाभरात जोरदार पाऊस कोसळत असून, विजाही पडत आहेत. निंबा येथील शेतकरी बाजीराव उर्फ बिर्ला प्रकाश बोरकर व विनोद सुरेश तेलगोटे हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना, अचानक त्यांच्यावर वीज पडली. यात बिर्ला बोरकर हे जागीच ठार झाले तर विनोद तेलगोटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बिर्ला बोरकर यांच्या निधनाने निंबा गावात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, रात्रीही पाऊस व वीजांचा कडकडाट जिल्हाभरात सुरु होता. या पावसाने दगडपारवा धरणातून पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे नदीला महापूर आला आहे. पाऊस व पुरामुळे शेतात असलेली सोयाबीनची नासाडी झाली असून, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
दगड पारवा प्रकल्पाचे दोन दरवाजे जोरदार पाऊस झाल्याने 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता 2.50 सेंटी मिटरने उचलण्यात आले. यातून 4.10 घनमिटर प्रतिसेकंद (चार हजार 100 लिटर प्रतिसेंकद विसर्ग सुरु करण्यात आला. ताशी 1 कोटी 47 लाख 60 हजार लिटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या वस्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान विद्रुपा नदी खडकी परिसरात मोर्णा नदीला येवून मिळते. त्यामुळे प्रशासनाने खडकी परिसरासह शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे .
—————–