BULDHANAVidharbha

कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींचे नाव खराब करणार नाही; कचरा संकलनाचा नाही, तर कचरा डेपोचा प्रश्न गंभीर आहे : मनोहर गिर्‍हे

– कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न २०२१ पासून मेहकर तहसीलदारांकडे पडून!

– कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर वेगाने वाढणार्‍या गावातील कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न अतिगंभीर होणार – मनोहर गिर्‍हे

बुलढाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र टीम) – ”निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींचे नाव आम्ही खराब होऊ देणार नाही. गावातील घाणकचरा विल्हेवाटीचा हा प्रश्न कचराडेपोअभावी गंभीर झालेला आहे. जे लोकं उघड्यावर कचरा टाकत आहेत, तेच डंपिंग स्टेशनला विरोध करत आहेत. तरीही आम्ही गावात कचरा साचू देत नाहीत. तसेच, नाल्यांना काही लोकं विरोध करत होते. त्यांचा विरोध मोडित काढून आजच आम्ही नालीप्रश्न सोडवला. काहीजण हेतुपुरस्सर आडवे येतात, त्यामुळे गावात किरकोळ समस्या निर्माण होतात. आम्ही सांमजस्याने व चर्चेतून एक एक प्रश्न सोडवत आहोत”, अशी माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना हिवरा आश्रम गावाचे नेते तथा सरपंचपती मनोहर गिर्‍हे यांनी दिली. आज तातडीने त्यांनी तुंबलेली नाली साफ करत, तसेच कचरा विल्हेवाट लावत, गेले काही दिवस वादग्रस्त बनलेला मुद्दा निकाली काढला.

मनोहर गिर्‍हे म्हणाले, की हिवरा आश्रम हे वेगाने वाढणारे गाव आहे. दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची थोडीफार तारांबळ होत असते. परंतु, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, नळ पाणीपुरवठा याबाबत कधीही समस्या निर्माण होऊ दिल्या नाहीत. गावाला डंपिंग स्टेशन (कचरा डेपो) नाही. पूर्वी आम्ही हा कचरा हिवरा बुद्रूक गावशिवारात टाकत होतो. परंतु, तेथील गावकर्‍यांनी विरोध केला. त्यानंतर अन्यत्र कचरा टाकण्यास सुरुवात केली तर तिकडेही विरोध झाला. कचर्‍यावरून काही मंडळी ग्रामपंचायतीची बदनामी करत असली तरी, त्यापैकी काहीजण कचरा डेपोलाही विरोध करत आहेत. त्यामुळे गावाला कचरा डेपो नसल्याने घाणकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ग्रामपंचायतीसमोर निर्माण झालेला आहे.

विशेष बाब म्हणजे, डंपिंग स्टेशनसाठी गट नंबर ६९मधील ई-क्लास जागा मिळावी, यासाठी मेहकरचे तहसीलदार यांना १८ ऑगस्ट २०२१ रोजीच पत्र दिलेले आहे. तहसीलदारांनी अद्यापही ग्रामपंचायतीला ही जागा दिली नाही. ई-क्लास असलेली ही जागा ग्रामपंचायतीला मिळाली तर तेथे गावातील कचरा संकलन करता येईल, व त्याद्वारे या कचर्‍यापासून कंपोस्ट खतदेखील तयार करता येईल. परंतु, मेहकरचे तहसीलदार याबाबत काहीही कार्यवाही करत नसल्याने गावातील घाणकचर्‍याची समस्या उग्र झालेली आहे. इतकी गंभीर समस्या असतानाही आम्ही गावात कचरा साचू देत नाही. ज्या साचलेल्या कचर्‍याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, त्या जागेचा प्रश्न कोर्टात पेंडिंग आहे. गावात कचरा संकलनासाठी घंटागाडीही ग्रामपंचायतीने घेतलेली आहे. त्याद्वारे नियमित कचरा संकलन होते. परंतु, काही ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकून, गावाला विद्रूप बनविण्याचे काम करत आहेत, असेही मनोहर गिर्‍हे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


आम्ही पू. शुकदास महाराजश्रींचे नाव खराब होऊ देणार नाही!

ओसाड माळरानावर निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम (विवेकानंद नगर) हे गाव वसवलेले आहे. राज्यभर या गावाचे नाव झालेले आहे. गावात घाणकचरा किंवा नाल्यांचे ओंगळ प्रदर्शन करून आम्ही महाराजश्रींच्या गावाचे नाव खराब करणे स्वप्नातही शक्य नाही. आजही आम्हाला महाराजश्रींचे विचार व कार्य प्रेरणा देतात. त्यांच्या विचारावरच ग्रामपंचायतीची विकासाभिमुख, सेवारत वाटचाल सुरु आहे. काही किरकोळ प्रश्न आहेत, ते तातडीने सोडविले जात आहेत. शासकीय यंत्रणेने सहकार्य केले तर कचरा डेपोचा प्रश्नही मार्गी लागेल. त्यासाठी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचेही सहकार्य आम्ही घेत आहोत.

– निर्मला मनोहर गिर्‍हे, सरपंच, हिवरा आश्रम
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!