– गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा त्यांच्या आदर्शाचा उत्सव साजरा करा : ठाणेदार हिवरकर
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत अठ्ठेचाळीस गावांपैकी बाविस गावांमध्ये एक गाव एक गणपती बसला असून, गावांतील तंटे दूर करून गावांच्या एकोप्यासाठीच्या ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या प्रयत्नांना यानिमित्ताने मोठे यश आले आहे. या २२ गावांत एकच गणपती बसवून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णयगणेशोत्सव मंडळानी घेतला आहे. या संकल्पनेचे स्वागत असून तरुणांनी गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा बाप्पाच्या आदर्शाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार गणेश हिवरकर यांनी केले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावामध्ये दरवर्षी गावागावातील तरुण वर्ग गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अगोदर आठ ते दहा दिवसापासून लोकवर्गणी गोळा करून उत्सव साजरा करतात. त्यामध्यें काही गावामध्ये एक गाव एक गणपती उत्सव साजरा न करता अनेक मंडळ सार्वजनिक ठिकाणी ठिकठिकाणीगणेशोत्सव साजरा करतात आणि गणपती समोर गाणे वाजविणे, मिरवणुकीत डीजेचा वापर करून दारूच्या नशेत नाचतात. त्यामुळे नाचण्यावरून आपसात क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होतात. हा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी गणेशोत्सवादरम्यान परिसरात सर्वत्र शांतता सुरक्षितता कायम राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व बीट अमलदार, पोलीस कर्मचार्यांना दिल्या. परिसरामध्ये गणेश भक्तिमय जल्लोषमय गजरात प्रथापरंपरांचे पालन करीत बुधवारी गणेश उत्साची सुरुवात झाली. पोलिस स्टेशन अंतर्गत एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव हा अभिनव उपक्रम २२ गावांनी हाती घेत, गणेश मंडळांनी यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून गणेश उत्सव सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला करण्यात आला आहे. यावेळी ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, एएसआय मोरर्शिंग राठोड, अच्युतराव शिरसाट, गजानन वाघ, पोहेकॉ कैलास उगले, काकड, दराडे, सोनकांबळे, समाधान झिने, पोफळे, गवई, जाधव, तथा हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार, आदी जण उपस्थित होते.
चांगली सजावट, आकर्षक देखावा करणार्या गणेश मंडळांना जिल्हा पोलिस अधीक्षकांचे बक्षीस
यावर्षीही श्री गणेश उत्सवादरमान आवाजाचा त्रास होणार नाही म्हणून मोठया आवाजात गाणे वाजू नये, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मिरवणुकीत डी.जे वाजवू नये. मिरवणुकीत डी. जे वाजविल्यास कडक कार्यवाही केली जाईल, त्यामुळे तरुणांनी गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा त्यांच्या आदर्शाचा उत्सव साजरा करून गणेश मंडळांनी गणेशोत्सव दरम्यान रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर समाज प्रबोधन, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविणे, तसेच ज्या गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची चांगली सजावट करुन आकर्षित देखावा केल्यास त्या गणेश मंडळांना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचे हातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देवून बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळांनी आकर्षित सजावट स्पर्धेत भाग घ्यावा, असे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.