Breaking newsHead linesWorld update

भाजपला दूर लोटत नितीशकुमार बिहारचे आठव्यांदा मुख्यमंत्री!

– राजद नेते तेजस्वी यादव यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– नितीशकुमार यांच्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून समर्थन
पाटणा – बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला जबरदस्त दणका देत, आणि सत्तेतून बाजूला सारत, जनता दल (संयुक्त)चे नेते नितीशकुमार यांनी आज (१० ऑगस्ट) आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते या नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील.
राजभवन येथील या शपथविधी सोहळ्याला लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हेदेखील उपस्थित होते. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचे दोन्ही नेत्यांचे ठरले आहे. त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला १२ तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला २१ मंत्रीपदे मिळणार आहेत.
राज्यपाल फागू चौहान यांनी या दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तेजस्वी यादव हे दुसर्‍यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून त्यांचे दर्शन घेतले. गेल्या २२ वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. २०००मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत नितीश कुमार यांनी हे नवे सरकार सत्तेवर आणले. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. नितीशकुमार यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समर्थन केले आहे. भाजप आपल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना-भाजप एकत्र होते. सेनेत दुरी कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि सेनेवर आघात केला. नितीशकुमार यांनी उचलेले पाऊल हे शहाणपणाचे आहे, असे म्हणत शरद पवार यांनी नितीशकुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार हे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज होते. रमजान महिन्यात ते लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला गेले होते. त्यानंतर जदयूने बोलावलेल्या इफ्तार पार्टीत नितीशकुमार यांच्यासोबत तेजस्वी यादव हे पाहुणचार करताना आढळले होते. हा प्रसंग पाहून जदयूच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. काका आणि पुतण्या एकत्र आले तर प्रदेशाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्यावर प्रमाणाबाहेर संपत्ती असल्याचा आरोप झाला आणि त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्ष सोडताना जदयू हे बुडते जहाज असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. नितीश कुमार सातत्याने भाजपापासून दुरावत गेले. ते केंद्र सरकारने बोलावेल्या सगळ्या बैठकांना गैरहजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित नव्हते. त्याचवेळी तेजस्वी यादव यांचीही नितीशकुमार यांच्यावरची टीकेची धार बोथट झाली होती.

———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!