जगभरातील लाखो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर नतमस्तक!
- बाबासाहेबांनी घेतली होती दसरा/ विजयादशमीदिनी ५ लाख अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा
बुलढाणा (संजय निकाळजे ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांचे मन बुद्ध धर्माकडे वळले. त्यानंतर त्यांनी दसरा अर्थात विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ५ लाख अनुयायांसह नागपूर येथे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून जिल्हा,महाराष्ट्र नव्हे तर भारतभरातून अनुयायी नतमस्तक होण्यासाठी नागपूर येथे दीक्षाभूमीवर येत असतात. आजही हे अनुयायी दीक्षाभूमीवर नतमस्तक होत असल्याचे दिसून येत आहे.
सन १९४० नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखन व अभ्यास करणे सुरू केले, १७ मे १९४१ मध्ये त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून लेख बुद्ध जयंती साजरी करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. हा लेख वाचून महार समाज बाबासाहेब बुद्ध धर्म स्वीकारणार असं समजू लागला. २० जून १९४६ रोजी मुंबईत सुरू असलेल्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी सिद्धार्थ ठेवले. तर औरंगाबाद येथे १९५० सालात उभारलेल्या महाविद्यालयाला त्यांनी मिलिंद असे नाव दिले. त्याच परिसरात १६५ एकर असलेल्या परिसराला नागसेनवन असे नाव दिले. त्यामुळे बाबासाहेब बुद्ध धम्मच स्वीकारणार याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी पाली भाषेचाही अभ्यास सुरू केला. १९५० मध्ये त्यांनी जनसंघ नावाची संस्था स्थापन केली. तसेच बौद्ध उपासना पाठ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. २५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथे बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी त्यांचे भाषण झाले. १२ मे १९५६ मध्ये मला बुद्ध धम्म का आवडतो ? याबाबत बीबीसीने बाबासाहेबाचे भाषण प्रकाशित केले होते. त्यावेळी त्यांनी बुद्ध धम्मामध्ये प्रज्ञा, करुणा, समता या तीन तत्त्वाचा संयोग आहे. त्यामुळे त्यांचा बुद्ध धम्म स्वीकारण्यासाठी विचार पक्का झाला. त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करू लागले. अस्पृश्यांचे नेते सोहनलाल शास्त्री यांच्याशी त्यांनी चर्चा केली. १९३५ पासून त्यांनी घोषणा केल्यानंतर वीस वर्ष लोटली. सन १९५६ मध्ये त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारण्याचा व त्याची तारीख विजयादशमी १४ ऑक्टोबर १९५६ ठरविण्यात आली. व या तयारीसाठी त्यांनी वामनराव गोडबोले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते तयारीला लागले. २३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी आपल्या सहिनिशी एक पत्र वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी दिले. त्यात बौद्ध धर्म स्वीकारण्याबाबत नमूद केले होते.
१४ ऑक्टोबर दसरा, विजयादशमी दिनी बाबासाहेब आपल्या पत्नीसह सकाळी ९:३० वाजता दीक्षाभूमीवर पोहोचले. सोबत नानकचंद रतू हे होते. तेथे पोहोचल्यानंतर बाबासाहेबांनी लाखोंचा समुदाय पाहिला व ते अक्षरशः भारावून गेले. या जनसमुदायाला त्यांनी हात जोडले व धन्यवाद दिले. या दिवशी सकाळीची वेळ असल्याने कोवळ्या उन्हात उपस्थित जनसमुदायाने तथागत बुद्धाचा व बाबासाहेबांचा जयघोष केला. यावेळी मंचकावर बुद्धाची मूर्ती झळकत होती. महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून लाखो अनुयायांच्या नजरा बाबासाहेबांच्या दिशेने पोहोचत होत्या. दीक्षा समारंभ भिकू चंद्रमणी महास्थवीर यांनी सकाळी साडेनऊ वाजता सुरू केला. पाली भाषेमधून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी तथागत बुद्धांना बाबासाहेबांनी पत्नीसह त्रिवार वंदन केले व पाच लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर तेव्हापासून दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी भीमसैनिक नतमस्तक होण्यासाठी गाव, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून येत असतात.