बिबी (ऋषी दंदाले) – शेतमजूर महिला शेतात गेल्यानंतर शाळकरी मुलांसाठी घराची चावी खिडकीत ठेवत असे. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने खिडकीतील चावी घेऊन घर साफ केले. सोन्या-चांदीच्या दागिन्यासह घरफोडी केल्यानंतर तो पळून गेला होता. परंतु, बिबी पोलिस ठाण्याचे चाणाक्ष ठाणेदार संदीप पाटील यांनी मोठ्या शिताफीने तपास करून हा चोरटा जेरबंद केला असून, त्याच्याकडून दागिनेदेखील हस्तगत केले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
सविस्तर असे, की पोलीस स्टेशन बिबी येथे दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी आशा किशोर जायभाये रा. मांडवा यांच्या तक्रारीवरून अपराध क्र. १५९/ २४ कलम ३३१(३), ३०५ (ए) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या तक्रारीप्रमाणे त्या शेतमजुरीचे कामावर गेलेल्या असतांना त्यांची मुले शाळेत जात असल्याने त्या घराची चावी खिडकीत ठेवत असत, अज्ञात आरोपीने लक्ष ठेवून फिर्यादी ह्या शेतात गेलेल्या असतांना घराचे कुलूप उघडून आत शिरून घरतील कपाटात ठेवलेले फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. यावरून बिबी पोलीस ठाणेदार संदीप पाटील व पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरूण सानप, रवी बोरे, यशवंत जैवळ यांनी अज्ञात आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता, दि.२३ ऑगस्ट २०२४ रोजी संशयित नामे सूरज उर्फ पप्पू जगदीश बोडखे वय १८ वर्ष ७ महिने रा. मांडवा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याच गल्लीत शेजारी राहणार्या फिर्यादी ह्या दिवसा घरी नसल्याचे पाहून त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली. त्यावरून बिबी पोलीसांनी आरोपीस गुन्ह्यात अटक केली असून, आरोपी दि.२७ ऑगस्ट २०२४ पावेतो पोलीस कोठडीत आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील गेल्या मालापैकी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास बिबी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक बास्टेवाड, पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरूण सानप, रवींद्र बोरे, यशवंत जैवळ यांनी केली आहे.