– गुन्हेगारांची अजिबात गय केली जाणार नाही – ठाणेदार विकास पाटील
मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील संवेदनशील अशा मेरा बुद्रूक गावात व मेरा चौकीवर अंढेरा पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, या गावावर आता अंढेरा पोलिसांचा तिसर्या डोळ्याद्वारे अहोरात्र वॉच राहणार आहे. गावातील महत्वाच्या पॉइंटवर हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, गुन्हेगारांची आता खैर नाही, असा सज्जड दम ठाणेदार विकास पाटील यांनी भरला आहे. केवळ मेरा हे गाव व परिसरच नाही तर परिसरातील इतर गावांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा अंढेराचे ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले आहे.
सविस्तर असे, की मौजे मेरा खुर्द येथून जालना जाण्यासाठी तसेच चिखली, खामगाव, जाफराबाद, लोणार जाण्यासाठी मेरा चौकी हे प्रवाशांसाठी सोयीस्कर ठिकाण असल्यामुळे येथे नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. तसेच वाहनांची रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी बर्याच प्रमाणात यापूर्वी अपघातसुद्धा झाले आहेत. त्यामध्ये बरेच लोक जखमी झाले आहेत. त्यातील काहींना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही लोक दगावलेसुद्धा आहेत. वेळेवर उपचार व्हावे, दवाखान्यामध्ये जाण्यासाठी काही पोलीस स्टेशनची मदत होईल का, या दृष्टीने अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गावांमधील नागरिकांना आव्हान केले, की मेरा खुर्द येथे जे काही अपकृत्य यापूर्वी घडले ते इथून पुढे घडणार नाही. यासाठी आपल्याला मेरा खुर्द येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नितांत गरज आहे. त्यांच्या आव्हानाला साथ देत मेरा खुर्द येथील पोलीस पाटील संजय ठाकूर, बाळू वराडे मेरा खुर्द सरपंच तसेच उपसरपंच तसेच सुज्ञ नागरिकांनी क्षणाचा हे विलंब न लावता, ठाणेदार विकास पाटील यांच्या आवाहनाला होकार दिला आणि आज, दिनांक १९ जुलैरोजी मेरा खुर्द येथे अढेरा पोलीस स्टेशन व मेरा खुर्दमध्ये सौर ऊर्जेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सदर सीसीटीव्ही हे सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे चोवीस तांस मेरा खुर्दवर पोलीस स्टेशनची नजर असणार आहे. मेरा खुर्द येथे शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींचीसुद्धा बरीच रेलचेल असते. त्यामुळेसुद्धा त्यांच्यावरसुद्धा अंढेरा पोलीस स्टेशनची नजर असणार आहे. मेरा खुर्द येथील प्रत्येक हालचालीवर पोलीस स्टेशनचा तिसरा डोळा हा सदैव लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे मेरा खुर्द येथे कोणत्याही प्रकारचे या पुढे अपकृत्य होणार नाही. तसेच यामार्गे जे वाहने किंवा चोरीचे प्रमाण यावरसुद्धा आळा बसणार आहे.
या उपक्रमाबाबत ठाणेदार विकास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक रोडवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. आज मेरा खुर्द येथे बसवला, यानंतर गांगलगाव, काटोडा, या ठिकाणीसुद्धा अंढेरा पोलीस स्टेशन व गावातील सुज्ञ नागरिक यांच्या सहकार्यातून तेथेसुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या कामावरसुद्धा आळा बसणार आहे. मेरा खुर्द येथे शिवशंकर विद्यालय तसेच उर्दू हायस्कूल यांच्यासुद्धा विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांची गर्दी असते. या ठिकाणी चिडीमार करणार्याचेसुद्धा या आधी प्रकार घडले आहे. त्यांच्यावरसुद्धा मेरा खुर्द येथील तिसरे डोळ्याची नजर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता चिडीमार चोर-दरोडेखोर यांच्यावरसुद्धा हळद बसणार आहे. तसेच गावातील प्रत्येक हालचालीवर अंढेरा पोलिस स्टेशनच्या तिसर्या डोळ्याची नजर असल्यामुळे कोणताही वाईट प्रकार घडणार नाही. यावर अंढेरा पोलीस स्टेशन लक्ष ठेवून असणार आहे, वाईट कृत्य करणार्यांवर सुद्धा आळा बसणार आहे.