साखरखेर्ड्यात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन घरे फोडली; ११ लाखांचा मुद्देमाल लंपास
– शेजारची घरे बाहेरून लावून घेतली, रात्रभर घरफोड्यांचे सत्र!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील वार्ड क्र.५ मधील तीन कुटुंबियांचे घराला कुलूप पाहून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ११ लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. उपरोक्त घटना ही ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटे रात्रभर घरे फोडत असताना साखरखेर्डा पोलिस काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांचे गस्ती पथक कामावर होते, की नाही, असाही संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
येथील मदनलाल बिसरलाल गोडाले (वय ७९) हे मुलीला भेटण्यासाठी २ जुलै रोजी अकोला येथे गेले होते. परत येत असताना खामगाव येथे मुक्कामी थांबले. ३ जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रथम वार्ड क्रमांक ५ मधील काही घरांच्या कड्या बाहेरुन बंद केल्या. त्यानंतर चोरट्यांनी मिलिंद पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पाच अंगठ्या आणि नगदी १० हजार रुपये लंपास केले. शेजारील गुलाबराव इंगळे यांचे घर फोडून त्यातील ३० हजार लंपास केले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या मदनलाल बिसरलाल गोडाले यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लाकडी पलंग खोलून सामान इतरत्र फेकून दागिने आणि मौल्यवान वस्तूचा शोध घेतला. आतील घरात प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याची अंगठी पावणेदोन तोळे (बाजार भाव १ लाख), दोन तोळ्याची साखळी, पाच तोळ्याचा राणीहार, दोन तोळ्याची गहू पोत, पाच तोळ्याचा लक्ष्मीहार, ५०० ग्रॅम चांदी, पाच अंगठ्या आणि नगदी रक्कम मिळून बाजार भावाप्रमाणे किमान ११ लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरट्यांनी घरफोडी करुन लंपास केला आहे. फिर्यादी मदनलाल विसरलाल गोंडाले यांनी येथील पोलिसात दिलेल्या तक्रारीत जावई चंद्रकुमार छगन आठवाल यांना भेटण्याकरिता अकोला येथे गेले होते. तेव्हा त्यांचा लहान मुलगा श्याम मदनलाल गोंडाले यांने त्यांना फोनद्वारे माहिती दिली की, आपले दरवाजाचे गेटचे तसेच दरवाज्याचे कुलूप तुटलेले असून, तुम्ही ताबडतोब घरी या. मदनलाल गोंडाले हे घरी येऊन त्यांनी पाहणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने लंपास केल्याचे दिसून आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला असून, आज घटणास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, डॉग पथक, फिंगर पथक दाखल झाले होते. ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास दुय्यम ठाणेदार रवी सानप, जनार्दन इंगळे हे पुढील तपास करीत आहेत.