– अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल; लवकरच चोरट्यांना हुडकून काढू – पोलिसांचा इशारा
अंढेरा (हनिफ शेख) – तालुक्यातील मिसाळवाडी शिवारात शेतकर्यांच्या स्प्रिंकलर नोझलच्या चोर्या करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मिसाळवाडी येथील शेतकर्यांचे नोझल चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ यांचेही 22 नोझल चोरट्यांनी लंपास केलेले आहेत. यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. याबाबत अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, नोझल चोरट्यांना पाताळातूनही हुडकून आणून, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा ठाणेदार विकास पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, भरोसा शेतशिवारातही अशीच घटना घडली असून, तेथेदेखील शेतकर्यांचे नोझल चोरीस गेले आहेत.
मिसाळवाडी येथील शेतकरी सतिश विष्णू भगत हे आपल्या शेतात फेरफटका मारण्याकरिता गेले असता, त्यांना शेतातील स्प्रिंकलरचे नोझल दिसून न आल्याने त्यांनी बाजूच्या शेतकर्यांना माहिती दिली. त्यावेळी त्या शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील नोझलसुद्धा चोरी गेल्याचे भगत यांना सांगितले. शेतीसाहित्य चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मिसाळवाडी येथील सतिष विष्णू भगत यांचे १२ नोझल, राजू रूस्तुमा मिसाळ यांचे १२ नोझल, नितीन नारायण मिसाळ यांचे १३ नोझल, अण्णा तेजराव मिसाळ यांचे १३ नोझल, भारत अंबादास भगत यांचे १० नोझल, उपसरपंच हनुमान मिसाळ यांचे 22 नोझल चोरट्यांनी लंपास केलेले आहेत. मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी घटनास्थळी जात, शेतकर्यांना दिलासा दिला, तसेच पोलिसांशी संपर्क साधून नोझल चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.
याबाबत शेतकरी नितीन मिसाळ, उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. नोझल चोरीमुळे शेतकर्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मिसाळवाडी शिवारातून वारंवार शेतीसाहित्य चोरीला जात असेल, तर शेती करायची कशी? असा प्रश्न या अनुषंगाने शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. तर अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, नोझल चोरांचा लवकरच छडा लावू, असा इशारा दिला आहे.
————–